नवी दिल्ली, 14 जून : रॉयल एनफील्ड (Royal Enfield) या देशातील आघाडीची दुचाकी वाहन उत्पादक कंपनीने एकापेक्षा एक उत्तम बाईक्स (Bikes) बाजारात आणल्या आहेत. आगामी वर्षातही कंपनी आपल्या जुन्या बाईक्सच्या नव्या मॉडेल्ससह, तर काही पूर्णतः नवीन अत्याधुनिक बाईक्स आणण्याच्या जय्यत तयारीत आहे. कंपनी पाच नव्या बाईक्स दाखल करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रॉयल एनफील्डच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
अलीकडेच, कंपनीनं काही नवीन बाईक मॉडेल्ससाठी ट्रेडमार्कही (Trademarks) दाखल केले असून नव्या बाईक मॉडेल्सची चाचणीही (Testing) घेण्यात येत आहे. रॉयल एनफील्ड नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश असलेल्या एका नवीन प्लॅटफॉर्मवर बाईक मॉडेल्स तयार करत आहे. या नवीन बाइक्स 350 सीसी ते 650 सीसी क्षमतेच्या असतील.
रॉयल एनफील्ड हंटर -
कंपनी रॉयल एनफील्ड हंटर (Royal Enfield Hunter) ही 350 सीसी क्षमतेचं इंजिन असलेली बाईक पुढील वर्षी दाखल करण्याची शक्यता आहे. सध्याच्या क्लासिक 350 पेक्षा ही बाईक अधिक कॉम्पॅक्ट आणि रेट्रो क्लासिक (Retro Classic) शैलीवर आधारित असेल.
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 -
कंपनी सध्या बाजारपेठेत लोकप्रिय असलेल्या आपल्या क्लासिक 350 च्या (Classic 350) सुधारित मॉडेलवरही काम करत आहे. ही बाईक J1-349 मोटर प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येण्याची शक्यता असून, त्यात नेव्हीगेटर फीचर देण्यात येऊ शकतं. ही बाईकदेखील पुढच्या वर्षी बाजारात लाँच होऊ शकते.
रॉयल एनफील्ड रोडस्टर -
रॉयल एनफील्डच्या या नव्या ट्वीन सिलेंडर क्रूझर (Cruiser) मोटरसायकलमध्ये स्प्लिट सीट्स, अलॉय व्हील्स, टीअरड्रॉप फ्युएल टँक आणि पुल बॅक स्टाईल हँडलबार फीचर्स देण्यात येणार आहेत. या बाईकचं टेस्टिंग सुरू असल्याचं नुकतचं आढळून आलं आहे. ही बाईक पुढील वर्षी दाखल होईल.
रॉयल एनफील्ड शॉटगन -
कंपनीनं काही दिवसांपूर्वीच नवीन बाईकसाठी शॉटगन (Shotgun) या नावाची नोंदणी केली आहे. कंपनीकडून सादर करण्यात येणारी ही नवीन क्रूझर बाईक आहे. रेट्रो स्टायलिंग आणि थीमवर आधारित ही बाईक यावर्षी जागतिक बाजारपेठेत सादर होऊ शकते. ही बाईक होंडा रेबेल आणि हार्ले डेव्हिडसन स्ट्रीटसारख्या बाईक्सशी स्पर्धा करेल. यामध्ये 648 सीसी क्षमतेचं ट्वीन सिलेंडर ऑईल कूल्ड इंजिन वापरण्यात येणार आहे. याआधी कंपनीने आपल्या कॉन्टिनेंटल जीटी आणि इंटरसेप्टरमध्ये याच इंजिनचा वापर केला आहे.
रॉयल एनफील्ड स्क्रॅम -
कंपनीने अलीकडेच ‘स्क्रॅम’चा (Scram) ट्रेडमार्क दाखल केला आहे. त्याचा या बाईकसाठी वापर केला जाऊ शकेल. ‘स्क्रॅम’ या शब्दाचा अर्थ वेगात धावणं असा आहे. या स्क्रॅम्बलर बाइकसाठी हे नाव अत्यंत समर्पक ठरेल. या बाईकमध्ये 650 सीसीचं इंजिन वापरण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bike riding, Royal enfield 350