नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : अनेक जण आपल्या मुलांना बाइकवर मागे-पुढे बसवून प्रवास करतात. जर तुम्हीही आपल्या लहान मुलांना घेऊन अशाप्रकारे प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) सुरक्षेच्यादृष्टीने नियमांत काही बदल केले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने मुलांना बाइकवर बसताना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी नवे नियम केले आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानुसार, बाइकवर आपल्या मुलांना घेऊन जाणाऱ्या लोकांना आता काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. यापूर्वी मंत्रालयाने बाइकच्या मागच्या सीटवरील दोन्ही बाजूला हँड होल्ड अनिवार्य केलं होतं. हँड होल्ड मागे बसलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आहे. बाइक ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावल्यास, हँड होल्ड अशावेळी अतिशय मदतशीर ठरतं.
तसंच याआधी बाइकच्या मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूला पाय ठेण्यासाठी पायदान अनिवार्य केलं होतं. त्याशिवाय बाइकच्या मागील टायरच्या डाव्या बाजूचा किमान अर्धा भाग झाकण्याची सूचना केली होती, जेणेकरुन मागे बसणाऱ्या व्यक्तीचे कपडे चाकात अडकू नये.
नव्या नियमांसाठी प्रस्ताव -
- नव्या प्रस्तावानुसार, 4 वर्षांपर्यतच्या मुलांना बाइकवर मागे बसवताना गाडीचा स्पीड लिमिट ताशी 40 किमीहून अधिक असू नये.
- मागे बसणाऱ्या 9 महिने ते 4 वर्षांपर्यंतच्या मुलांना क्रॅश हेल्मेट घालणं आवश्यक असणार आहे.
- त्याशिवाय 4 वर्षांपर्यंतच्या मुलांना मागे बसवताना सेफ्टी हार्नेसचा वापर करणंही आवश्यक असणार आहे.
मंत्रालयाने मागवल्या सूचना -
सेफ्टी हार्नेस मुलांना घालण्यात येणारं जॅकेट असतं, ज्याची साइज अॅडजस्ट करता येते. यामुळे मुलं बाइक चालकाशी बांधली जाऊ शकतात. सेफ्टी जॅकेटला जोडलेले पट्टे मुलाला आणि ड्रायव्हरला एकत्र ठेवतात. मंत्रालयाने या प्रस्तावावर हरकती आणि सूचनाही मागवल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.