नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : एकीकडे कोरोना, लॉकडाउनचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला असताना आता पेट्रोल-डिझेल दरवाढ, LPG Gas दरवाढीने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. असं असतानाच आता CNG आणि PNG दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून ही वाढ होण्याचं बोललं जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नॅच्युरल गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे याचा घरगुती बाजारावर मोठा परिणाम होतो आहे. भारतीय बाजारात नॅच्युरल गॅसच्या किंमती किती वाढतील? आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने भारतात नॅच्युरल गॅसच्या किंमतीवर किती परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या यामागे नेमकी काय कारणं आहेत.
भारतात CNG-PNG मध्ये किती होऊ शकते वाढ?
आंतरराष्ट्रीय बाजारात नॅच्युरल गॅसच्या किंमतीत 60 ते 70 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ डॉलरमधील आहे. त्यानुसार भारतीय बाजारात, CNG आणि PNG दरात 10 ते 15 टक्के वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
APM (Administrative Price Mechanism) गॅसची किंमत सरकार भारतात दर सहा महिन्यांनी ठरवते, त्याची किंमत सध्या 1.79 डॉलर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 5.5 ते 6 डॉलरपर्यंत पोहोचली आहे.
जर आंतरराष्ट्रीय बाजारात नॅच्युरल गॅसच्या किंमतीत 60 ते 70 टक्क्यांची वाढ झाली तर, APM Gas च्या किंमती 3.2 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या किंमतीच्या आधारे कार, इतर वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि पीएनजीचे वाढतील.
ऑक्टोबर 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात नॅच्युरल गॅसच्या किंमती 2.2 डॉलरपर्यंत होत्या. आता 2021 मध्ये हा दर 5.5 डॉलरपर्यंत पोहोचला आहे.
Natural Gas दरवाढीची काय आहेत कारणं?
सर्वात महत्त्वाचं कारण जगभरात गॅसच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होणं हे आहे. त्याशिवाय अमेरिकेत नॅच्युरल गॅसचं उत्पादन कमी झालं आहे. उत्पादन 52 bcf दर आठवड्यावरुन घसरुन ते 46 bcf प्रति आठवड्यावर पोहोचलं आहे. तसंच, चीनमध्ये नॅच्युरल गॅसच्या आयातीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. कोळशाच्या किंमती वाढल्यानेही नॅच्युरल गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol and diesel price