नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा वाहन अपघातात मृत्यू झाल्याने वाहनातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ऑक्टोबरपासून ऑटो कंपन्यांसाठी आठ आसनी वाहनांमध्ये किमान 6 ‘एअरबॅग’ असणे बंधनकारक करण्याचा विचार करत आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की, वाहन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून वाहनांची सुरक्षितता वाढेल. आठ आसनी वाहनांसाठी किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रश्नावर गडकरी म्हणाले, “प्रयत्न तर तोच आहे”. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर रस्ता सुरक्षेची चर्चा पुन्हा सुरू सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूने भारतीय रस्त्यांवरील सुरक्षेबाबत, विशेषत: मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर अनेकदा दुर्लक्ष केल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. असे मानले जाते की मिस्त्री यांच्या मृत्यूमागील मुख्य कारण हे होते की त्यांनी मर्सिडीज जीएलसी कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट वापरला नाही. वाचा - रस्ते अपघातासाठी कोण जबाबदार?, नितीन गडकरींनी दिलं ‘हे’ कारण अलार्म स्टॉपर वर बंदी घातली जाऊ शकते या घटनेने सरकारला सीट बेल्टच्या नियमांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) लवकरच सीट बेल्ट वॉर्निंग अलार्म बंद करण्यासाठी वापरल्या जाणार्या सिस्टमवर बंदी घालू शकते. अशा अनेक क्लिप बाजारात विकल्या जात आहेत ज्याचा वापर सीट बेल्टचा अलार्म बंद करण्यासाठी केला जातो. सरकार त्याच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याच्या तयारीत आहे. हे चार निर्णय सरकार घेऊ शकते हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार मंत्रालय याबाबत चार महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. प्रथम, मंत्रालय सीट बेल्ट बीप अलार्म स्टॉपर्स वर बंदी घालू शकते. कारमध्ये सहा एअरबॅग्जवर अनिवार्य, कार उत्पादकांसाठी मधल्या आणि मागील सीटसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट अनिवार्य करू शकते आणि सीट बेल्टच्या महत्त्वाबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी मोहीम राबवू शकते. याशिवाय, मंत्रालय नवीन रस्त्यांच्या डिझाइन प्रस्तावांचे काटेकोरपणे पुनरावलोकन करू शकते. या नियमांचे पालन करण्यात अयशस्वी ठरणाऱ्यांना कठोर दंड ठोठावू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.