नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : भारतातील मोठे उद्योगपती आणि टाटा उद्योग समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा रविवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला. मर्सिडीज कंपनीच्या कारमध्ये मिस्त्रीसह चौघेजण प्रवास करत होते. मिस्त्रीसह आणखी एकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या मोठ्या घटनेनंतर आता रस्ते अपघातांवरुन मोठी चर्चा होत आहे. यात देशाचे रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आपले मत व्यक्त केले. काय म्हणाले मंत्री नितीन गडकरी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सदोष प्रकल्प अहवालांमुळे रस्ते अपघात होतात, असे मत व्यक्त केले आहे. तसेच कंपन्यांना महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या बांधकामासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की, सरकार नवीन तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देत आहे. “कंपन्यांनी तयार केलेले काही डीपीआर (Detailed Project Reports) सर्वात वाईट आहेत आणि ते देशातील रस्ते अपघातांना जबाबदार आहेत,” असे गडकरी यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले. डीपीआर तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. “शुरुवात वहां से करो. अगर वो सुधारेंगे नहीं, तो पूरा तुम्हारा सत्यानाश हो जायेगा, असे ते म्हणाले. म्हणजे सुरुवात डीपीआरपासून व्हायला हवी. डीपीआर तयार करणाऱ्या कंपन्यांनी सुधारणा केली नाही, तर समस्या पुन्हा निर्माण होईल, असे मत त्यांनी मांडले. अकुशल ड्रायव्हरच्या हातात नवीन मर्सिडीज कार दिल्यावरसुद्धा समस्या निर्माण करू शकते, असेही ते म्हणाले. दरम्यान, गडकरींनी रस्ते प्रकल्पांना विलंब का होत आहेत, या कारणे शोधण्यावर भर दिला. विलंबामुळे बांधकामाचा वाढता खर्च ही देखील एक महत्त्वाची चिंता आहे, असे ते म्हणाले. 2021 मध्ये सर्वात जास्त अपघाती मृत्यू - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात कार डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यानंतर देशात रस्ते अपघातावर एकच चर्चा सुरू झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये संपूर्ण भारतभरात 1.55 लाखांहून अधिक लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. दररोज सरासरी 426 किंवा प्रत्येक तासाला 18 मृत्यू झाला. ही आकडेवारी आतापर्यंतच्या कोणत्याही वर्षात नोंदवलेले आकडेवारीपेक्षा सर्वांत जास्त मृत्यू दर्शवते आहे. हेही वाचा - Cyrus Mistry Death: तुमच्या सुरक्षेसाठी AirBag किती महत्त्वाची? वाहनात किती एअरबॅग असाव्या? गेल्या वर्षी अपघातांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक असताना, रस्ते अपघात आणि जखमींची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत कमी झाली आहे, असे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या NCRB च्या अहवालातून समोर आले आहे. काही राज्यांमध्ये रस्ते बांधणीच्या निकृष्ट दर्जाबाबतही नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, दरवर्षी राज्य सरकारे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 10,000-15,000 कोटी रुपये खर्च करत आहेत. “दर 2-3 वर्षांनी आम्ही रस्त्यांच्या देखभालीवर पैसे खर्च करतो… आम्ही आमचा पैसा का वाया घालवत आहोत,”, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.