मुंबई, 18 ऑक्टोबर : रस्त्यावर चालणारी कार अचानक फोल्ड होते किंवा आपला आकार बदलते, हे आपण फक्त चित्रपटांमध्ये पाहिलेलं आहे. 'ट्रान्सफॉर्मर्स' या हॉलिवूडपटामध्ये अशा प्रकारच्या कार दाखवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत केवळ चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या या फोल्डेबल कार्स (Foldable car) लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. सर्वांत अगोदर इस्रायलमध्ये अशा कार धावताना दिसू शकतात. सिटी ट्रान्सफॉर्मर या इस्रायली ऑटोमोटिव्ह कंपनीनं (City Transformer) आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी (Healthcare Facility) फोल्डेबल कारचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिटी ट्रान्सफॉर्मरनं युनायटेड हत्झाला या इस्रायली स्टार्टअपशी (United Hatzalah) करार केला आहे. ही कार उपलब्ध जागेनुसार दुमडली जाऊ शकते.
अशा कार्स प्रत्यक्षात रस्त्यावर आणल्यास कमी रुंदीचे रस्ते असलेल्या ठिकाणांवरदेखील आपत्कालीन आरोग्य सेवा पोहचवणं शक्य होणार असल्याचा दावा केला जात आहे. युनायटेड हत्झाला हे इस्रायलमध्ये मोटरसायकल अॅम्ब्युलन्स सेवा पुरवणारं स्टार्टअप आहे, तर सिटी ट्रान्सफॉर्मर ही एक ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. 2014 मध्ये स्थापन झालेल्या सिटी ट्रान्सफॉर्मर कंपनीनं सीटी -1 इलेक्ट्रिक कारची निर्मिती केली आहे. 2.49 मीटर लांब आणि 1.4 मीटर रुंद असलेली ही कार आपला व्हीलबेस एक मीटरपर्यंत फोल्ड करू शकते. यात एका ड्रायव्हरसह दोन व्यक्तींना बसण्यासाठी जागा आहे. प्रवास करणाऱ्या व्यक्तींमध्ये लहान मुले असतील एका सीटवर दोघे जण बसू शकतात. रस्त्यावर जागा कमी असल्यास त्याचा व्हीलबेस आतमध्ये खेचला जातो. विशेष म्हणजे व्हीलबेस दुमडल्यानंतरही केबिनच्या आकारात कोणताही बदल होत नाही.
VIDEO - ट्रेनखाली जाणार होती प्रेग्नंट महिला, जवानाने मृत्यूच्या दारातून खेचूलं
सामान्य स्थितीत ही गाडी ताशी 90 किलोमीटर्स वेगानं धावू शकते. कार फोल्ड केल्यानंतर गाडीचा वेग ताशी 45 किमी होतो. गाडी फोल्ड करून फक्त रुंदी कमी करता येऊ शकते. गाडीच्या लांबीमध्ये कोणतेही बदल करता येत नाहीत. एकदा चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार 100 ते 150 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. टाइम्सद्वारे 2020 या वर्षातल्या 100 सर्वोत्तम शोधांच्या यादीमध्ये सीटी -1 कारचा समावेश करण्यात आला होता.
ही फोल्डेबल कार दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये आरोग्य सेवा सुधारण्यास मदत करील. एका सामान्य वाहनाला लागणाऱ्या पार्किंगच्या जागेत चार सीटी -1 इलेक्ट्रिक कार बसू शकतात. त्यामुळं शहरी भागात भेडसवणारी पार्किंगची समस्या सोडवण्यासदेखील यामुळे मदत होईल, असं सिटी ट्रान्सफॉर्मर्स कंपनीचं म्हणणं आहे. हॅत्झाला आणि सिटी ट्रान्सफॉर्मर्ससह मिळून नवीन कार विकसित करण्याचं काम करत असल्याची माहिती युनायटेड हत्झालाचे उपाध्यक्ष डोव मेझेल यांनी टाइम्स ऑफ इस्रायलला दिली.
Shocking! सावत्र मुलीसोबत मांडला तिसऱ्यांदा संसार; मात्र लग्नाचा भयावह शेवट
इस्रायलमधल्या या दोन्ही कंपन्यांची कल्पना प्रत्यक्ष रस्त्यावर यशस्वी झाल्यास जगभरातील आरोग्य सेवेला मोठा आधार मिळू शकतो. जगाच्या कानाकोपऱ्यात तत्काळ आरोग्य सेवा पोहोचवण्यास मदत होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.