इंधनाचे वाढते दर आणि प्रदूषणामुळे अनेकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत आहे. सध्या बाजारात विविध फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स, कार्स पाहायला मिळत आहे. यापैकी काही वाहनांमध्ये खास तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. सध्या ऑटो एक्स्पोमधली एक स्कूटर आणि ती तयार करणाऱ्या दोन व्यक्ती जोरदार चर्चेत आहेत. अर्थात त्यामागे कारणदेखील तितकंच खास आहे. मुंबईतल्या लायगर मोबिलिटी या स्टार्टअपने जगातली पहिली ऑटो-बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली आहे. विशेष म्हणजे ही स्कूटर पूर्णतः भारतीय बनावटीची आहे. यातलं ऑटो बॅलन्सिंग फीचर चर्चेचा विषय ठरलं आहे. याशिवाय स्कूटरमध्ये आणखी काही खास फीचर्स आहेत.
ऑटो एक्स्पोचं व्यासपीठ जगभरातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या, प्रगत तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना असलेल्या वाहनांच्या सादरीकरणाने सजलं आहे. दरम्यान, या एक्स्पोमध्ये देशातल्या दोन आयआयटीयन्सचं वेगळं टॅलेंट पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या लायगर मोबिलिटी या कंपनीने या ऑटो एक्स्पोत जगातली पहिली ऑटो बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. ही स्कूटर पूर्णतः भारतीय बनावटीची आहे. ही स्कूटर लवकरच विक्रीसाठी लाँच केली जाणार आहे.
लायगर मोबिलिटीचे सहसंस्थापक विकास पोतदार हे इंदूरचे असून, मद्रास आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. तसंच आशुतोष हे खरगपूर आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. ही ऑटो बॅलन्स स्कूटर तयार करण्याची कल्पना कशी सुचली, त्यांची वाटचाल कशी होती आणि या ब्रँडच्या नावामागची कहाणी काय आहे, हे सांगितलं.
हेही वाचा : Auto Expo 2023 : नाद नाही करायचा! पाण्यातही धावणार जबरदस्त कार; भारतीय जवानही हैराण
`ही स्कूटर आणि त्यातल्या तंत्रज्ञानावर आमचं स्टार्टअप गेल्या सहा वर्षांपासून काम करत आहे. या स्कूटरमध्ये ऑटो बॅलन्सिंग तंत्राचा वापर करण्यात आला आहे. हे मुळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयवर आधारित तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामागे गायरोस्कोपिक प्रिन्सिपल ऑफ फिजिक्स हे तत्त्व काम करतं. त्यामुळे ही स्कूटर स्थिर राहते आणि यात वापरल्या गेलेल्या सेन्सरच्या मदतीने ती एक जागेवर स्थिर उभी राहू शकते. यातला सेन्सर स्कूटरभोवतीचा सर्व डेटा जमा करतो आणि एआय त्यावर प्रक्रिया करतं,` असं विकास पोतदार यांनी सांगितलं. लायगर मोबिलिटीने हे तंत्रज्ञान पूर्णपणे इन-हाउस विकसित केलं आहे. यापूर्वी महिंद्रा ड्युरो स्कूटरवर या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ डेमो कंपनीने दाखवला होता. या वेळी ऑटो एक्स्पोमध्येही कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरचा डेमो दाखवला आहे. त्यात एक व्यक्ती स्कूटरवर बसली आहे आणि ती कोणत्याही आधाराशिवाय स्कूटर कमी वेगात मागे-पुढे करताना दिसत आहे.
परंतु, या स्कूटरमध्ये साइड स्टँड देण्यात आलेला आहे. त्याविषयी विकास यांनी सांगितलं, `ऑटो बॅलन्सिंग तंत्रज्ञान स्लो-स्पीडसाठी आहे. कारण स्कूटर जास्त वेगात स्वतःला संतुलित करते; पण जेव्हा स्कूटर चालू असते आणि तिचे सर्व सेन्सर सक्रिय असतात तेव्हाच हे तंत्रज्ञान काम करतं. स्कूटर बंद असेल तेव्हा स्थिर उभं राहण्यासाठी तिला साइड किंवा मेन स्टँडची गरज असेल.`
सर्वसाधारणपणे असं दिसून येतं, की रस्त्यावर स्कूटर चालवताना अनेकांचा स्लो-स्पीडमध्ये बॅलन्स जातो आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. याशिवाय सिग्नलवर थांबताना किंवा खराब रस्त्यावरून टू व्हीलर चालवताना वाहन चालकाला वारंवार पाय जमिनीवर ठेवावे लागतात. त्यामुळे त्याची दमछाक होते आणि प्रवासही जोखमीचा होतो. तुम्हाला सुरक्षित आणि आरामदायी राइड प्रदान करणं हा ऑटो बॅलन्सिंग तंत्रज्ञान वापरण्यामागचा मूळ उद्देश आहे. चिखलात, खराब रस्त्यांवर कमी वेगाने गाडी चालवत असाल किंवा सिग्नलवर थांबत असाल तर तुम्हाला पाय जमिनीवर ठेवण्याची गरज नाही.
हेही वाचा : एकदाच चार्ज आणि 550KM सुसाट पळणार कार, पाहा पहिल्या मारुती इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
या ब्रँडनेमविषयी बोलताना विकास यांनी सांगितलं, `दुचाकी असूनही ही स्कूटर चारचाकी वाहनाप्रमाणे आरामदायी आहे. स्लो-स्पीडमध्ये असताना किंवा थांबताना तुम्हाला पाय जमिनीवर ठेवण्याची गरज भासत नाही. अशी दोन्ही प्रकारची वैशिष्ट्यं तुम्हाला या स्कूटरमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे या ब्रँडला लायगर नावाच्या एका हायब्रिड प्राण्याचं नाव देण्यात आले आहे. हा प्राणी Lion आणि Tiger या दोन प्राण्यांची संमिश्र आवृत्ती आहे.`
या इलेक्ट्रिक स्कूटरचे लायगर एक्स आणि लायगर एक्स प्लस असे दोन व्हॅरिएंट्स लाँच होणार आहेत. लायगर एक्स ही ऑटो बॅलन्सिंग स्कूटर 60 किलोमीटरपर्यंत रेंज देईल. लायगर एक्स प्लस सिंगल चार्जमध्ये सुमारे 100 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देईल. यातल्या हायर व्हॅरिएंटमध्ये डिटॅचेबल बॅटरी दिली जाणार आहे. ही बॅटरी काढून तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये चार्ज करू शकता. ही बॅटरी साध्या 15 अॅम्पियरच्या घरगुती वापरातल्या सॉकेटला कनेक्ट करून चार्ज करू शकता. या स्कूटरसोबत चार्जर देण्यात येईल. या चार्जरद्वारे बेस व्हॅरिएंटची बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे तीन तास, तर हायर व्हॅरिएंटची बॅटरी चार्ज होण्यासाठी साडेचार तासांचा वेळ लागेल. फास्ट चार्जरदेखील मिळेल; पण त्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. या स्कूटरमध्ये 4G आणि जीपीएस कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. सध्या तरी कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्पेसिफिकेशन्सबाबत एवढीच माहिती शेअर केली आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत कंपनी इतर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स स्पष्ट करील.
विकास यांनी सांगितलं, `या वर्षी दिवाळीपर्यंत ही स्कूटर अधिकृतपणे विक्रीसाठी मार्केटमध्ये लाँच केली जाईल. त्यापूर्वी जुलैमध्ये या स्कूटरसाठी बुकिंग सुरू होऊ शकतं. ही इलेक्ट्रिक स्कूटर टप्प्याटप्प्याने बाजारात आणली जाणार आहे. ही स्कूटर पहिल्यांदा कोणत्या शहरात लाँच केली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही; पण ही स्कूटर सर्वप्रथम पुण्यात लाँच होईल, असा अंदाज आहे.`
बेस लायगर एक्स व्हॅरिएंटची किंमत सुमारे 90 हजार रुपये असेल. तसंच लायगर एक्स प्लस व्हॅरिएंटच्या किमतीविषयी अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही; पण या व्हॅरिएंटची किंमत यापेक्षा जास्त असणार हे नक्की. एकूण पाच रंगांमध्ये ही स्कूटर बाजारात दाखल होणार आहे. एक्स्पोदरम्यान, कंपनीने लाल, पांढरा आणि स्काय ब्लू रंगांमधली मॉडेल्स प्रदर्शित केली. कंपनी या स्कूटरसाठी एक एक्सपिरियन्स सेंटर सुरू करणार असून, ऑनलाइन विक्रीचंही नियोजन केलं जात आहे. सुरुवातीला 20 हजार युनिट्सचं उत्पादन करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे, जे भविष्यात एक लाख युनिट्सपर्यंत वाढवलं जाईल.
कंपनीने या स्कूटरचे सर्व पार्ट्स स्थानिक पातळीवर तयार केले आहेत. याचाच अर्थ ही ऑटो बॅलन्सिंग स्कूटर पूर्णतः भारतीय बनावटीची आहे. कंपनीने औरंगाबादमध्ये स्कूटर उत्पादनाचा कारखाना उभारला आहे. `आत्तापर्यंत जगातल्या कोणत्याही कंपनीने प्रॉडक्शन रेडी लेव्हलवर कोणतंही ऑटो बॅलन्सिंग इलेक्ट्रिक वाहन सादर केलेलं नाही; मात्र होंडा आणि यामाहा सारख्या ब्रँड्सने कन्सेप्ट मॉडेल दाखवलं होतं,` असं विकास यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Auto Expo 2023, Electric vehicles