औरंगाबाद, 19 ऑक्टोबर: औरंगाबाद (Aurangabad) शहरात प्राध्यापक राजन शिंदे (rajan shinde murder case) खून प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. राजन शिंदे यांची हत्या का आणि कुणी केली, याचा गेल्या सात दिवसांपासून शोध घेतला जात होता. अखेर पोलिसांनी (aurangabad police) या खून प्रकरणाचा छडा लावला आहे. राजन शिंदे यांची हत्या त्यांच्या घरातील अल्पवयीन सदस्याने केल्याचं तपासातून समोर आलं आहे.
औरंगाबादच्या एन 2 भागात राहणारे प्राध्यापक राजन शिंदे यांचा खून गेल्या आठवड्यात 11 ऑक्टोबर रोजी झाला होता. सोमवारी पहाटे राहत्या घरात त्यांच्या डोक्यावर डंबलने वार करण्यात आला होता. यानंतर त्यांच्या पोटावर बसून त्यांच्या हाताच्या नसा कापण्यात आल्या होत्या. शिवाय राजन शिंदे यांचा गळाही चिरण्यात आला. निर्दयीपणे केलेल्या या हल्ल्यात त्यांचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. या खुनाचा तपास करणं पोलिसांसाठी आव्हान होतं. घरातीलच कुणीतरी खून केला असावा असा पोलिसांना संशय होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा-दसऱ्याच्या दिवशीच एकुलता एक मुलगा बनला राक्षस; आईसोबतच्या कृत्यानं पुणे हादरलं!
हत्येचं नेमकं कारण काय?
मृत प्राध्यापक राजन शिंदे आपल्या नात्यातील एका अल्पवयीन मुलाला नेहमीच 'ढ' म्हणत त्याचा पाणउतारा करायचे. प्राध्यापक शिंदे यांच्याकडून वारंवार होणारा अपमान ऐकून संबंधित मुलाच्या मनात प्राध्यापक शिंदे यांच्याबाबत प्रचंड द्वेष निर्माण झाला होता. अगदी किरकोळ कारणातून देखील दोघांत वारंवार वाद होत होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोघं एकमेकांशी बोलत देखील नव्हते. दरम्यान 10 ऑक्टोबर रोजी प्राध्यापक राजन शिंदे आणि संबंधित मुलामध्ये पुन्हा एकदा वाद झाला. रात्री दीड वाजेपर्यंत त्यांच्यात वाद सुरू होता. याच रागातून त्याने प्राध्यापक शिंदे यांची हत्या केली आहे.
हेही वाचा-पुण्यातील IT अभियंत्याकडून उच्च शिक्षित तरुणीला दगा; लॉजवर बोलावून केला घात
नेमकं काय घडलं त्या रात्री?
प्राध्यापक राजन शिंदे सतत अपमान करतात, म्हणून संबंधित मुलाच्या मनात शिंदे यांच्याबाबत प्रचंड राग होता. 10 ऑक्टोबर रोजी वाद झाल्यानंतर, प्राध्यापक शिंदे आपल्या घरात हॉलमध्येच झोपी गेले होते. ही संधी साधून संबंधित मुलाने राजन शिंदे यांच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार त्याने पहाटे तीनच्या सुमारास गाढ झोपलेल्या राजन शिंदे यांच्या डोक्यात डंबलने घाव घातला. हा वार इतका भयंकर होता, की शिंदे कसला आवाज न करता जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. पण राजन शिंदे जिवंत असावेत, असं संबंधित मुलाला वाटलं, त्यामुळे त्याने किचनमधील चाकूने शिंदे यांच्या नसा कापल्या तसेच गळाही चिरला.
हेही वाचा-VIDEO: क्लास बुडवला म्हणून भयंकर शिक्षा; विद्यार्थ्याला केस पकडून अमानुष मारहाण
यानंतर त्याने फरशीवर सांडलेलं रक्त घरातील एका टॉवेलने पुसलं आणि हत्या करण्यासाठी वापरलेली सर्व शस्त्रे टॉवेलमध्ये गुंडावून घरापासून 100 मीटर अंतरावर असणाऱ्या एका जुन्या विहिरीत टाकले. आरोपी अल्पवयीन मुलगा हा गुन्हेगारी संबंधित वेब सीरीज पाहात होता. यातूनच त्याने हत्येचा कट रचल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे घरातील अन्य सदस्यांना खुनाबाबत कोणतीही माहिती नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली असून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Murder Mystery