औरंगाबाद, 14 जुलै: वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) परिसरातील विटावा गावात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका 50 वर्षीय व्यक्तीला पाच जणांनी गोड बोलून गाडीत बसवलं अन् गावच्या फाट्यावर नेऊन लाकडी दांड्यानं मारहाण (Beating) केली आहे. जुन्या राजकीय वादातून पाच जणांनी ही बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दगडू कावळे असं मारहाण झालेल्या 50 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. दगडू काळे हे वाळूज एमआयडीसी परिसरातील विटावा गावातील रहिवासी आहे. त्यांचा मागील काही काळापासून कृष्णा शिनगारे याच्याशी राजकीय वाद आहे. दरम्यान, 12 जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास आरोपी कृष्णा शिनगारे फिर्यादी कावळे यांना घरी भेटायला आला. त्यानं फिर्यादी कावळे यास आपल्या अल्टो कारमध्ये बसायला सांगितलं. यावेळी आरोपी कृष्णा शिनगारेचे तीन मित्र आधीपासूनचं कारमध्ये होते.
हेही वाचा-VIDEO: नागपुरात बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्सवर दरोडा, घटनेचा CCTV आला समोर
टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित सर्वजण रात्री नऊच्या सुमारास विटावा गावच्या फाट्यावर आले. याठिकाणी सर्वांनी राजकीय विषयावर गप्पा मारल्या. दरम्यान आरोपी कृष्णा शिनगारे यानं जुना राजकीय वाद उकरून फिर्यादीस शिवीगाळ करायला सुरुवात केली. फिर्यादीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीनं कावळे यांच्या उजव्या कानावर चापट मारली. यातून वाद वाढत गेला. फिर्यादीनं मदतीसाठी आरडाओरडा केला असता, आरोपीनं हातातील लाकडी दांड्यानं पाठीवर मारहाण करायला सुरू केली.
हेही वाचा-महिलेच्या गळ्यातील सोनं चोरणं पडलं महागात, गावकऱ्यांनी दिली भयंकर शिक्षा
तर आरोपीसोबतच्या अन्य साथीदारांनी हातानं मारायला सुरुवात केली. तसेच आरोपींनी पुढच्या वेळी तुला बघून घेतो, अशी धमकी दिल्याचंही फिर्यादीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादी दगडू कावळे यांनी जखमी अवस्थेत वाळूज पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी कृष्णा शिनगारे याच्यासह अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Beating retreat, Crime news