औरंगाबाद, 05 जुलै: मुलीनं कंपनीतील एका सहकारी मुलासोबत मैत्री (Friendship with male Colleague) केल्याचा राग मनात धरून एका बापानं आपल्या मुलीला नरक यातना (Punishment) दिल्या आहेत. मागील कित्येक दिवसांपासून पीडित मुलगी आपल्या वडिलांचा त्रास निमूटपणे सहन करत होती. पीडित मुलीचा त्रास शेजारील एका महिलेला न बघवल्यानं तिनं घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दामिनी पथक आणि सिडको पोलिसांनी संबंधित मुलीसह तिच्या आईची नरधम बापाच्या तावडीतून सुटका केली आहे.
आरोपी बाप हा एका मोठ्या कंपनीतून सेवानिवृत्त झालेला आहे. तो आपली पत्नी आणि दोन मुलींसह टीव्ही सेंटर परिसरात वास्तव्याला आहे. त्यांची मोठी मुलगी बी.कॉम उत्तीर्ण असून एका कंपनीत नोकरीला होती. कंपनीत काम करत असताना तिची कंपनीतील एका तरुणासोबत मैत्री झाली. पण याचा सुगावा पीडितेच्या वडिलांना लागला. 'तू माझी समाजात बदनामी केली' म्हणत बापानं तिला बेदम मारहाण केली.
हेही वाचा-बापानंच उद्धवस्त केला मुलीचा संसार; गोळीबारात चौघांचा मृत्यू तर दोघं गंभीर जखमी
यानंतर मुलीनं नोकरी सोडली. पण यानंतरही बापाचा रोष कमी झाला नाही. तो तिला सतत मारहाण करत राहिला. त्यानं अनेकदा पीडितेच्या हातावर कापूर जाळला आहे. यामुळे तिच्या तळहाताला मोठी जखम देखील झाली आहे. त्याचबरोबर जेव्हा मनात येईल, तेव्हा बाप तिला सर्वांगावर बेदम मारहाण करायचा यामध्ये पीडित मुलीचं अंग अक्षरशः काळं-निळं पडत होतं. नराधम बापाचा हाच दिनक्रम मागील बऱ्याच काळापासून सुरू होता. मुलीला होणारी मारहाण थांबवण्यासाठी आईनं मध्यस्थी केली, तर तो तिलाही मारहाण करायचा.
हेही वाचा-शेतातून घरी परतणाऱ्या विवाहितेचं अपहरण; निर्मनुष्य ठिकाणी नेऊन घृणास्पद कृत्य
बापाच्या सततच्या मारहाणीमुळे पीडित मुलीची मानसिक स्थिती देखील बिघडली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दाखल झालेल्या दामिनी पथकानं दोघींशी संवाद साधून तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. पण अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. पीडित मायलेकींनी आता आपल्या गावाला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.