औरंगाबाद, 12 मे : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी (Akbaruddin Owaisi) यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. अकबरुद्दीन औवेसी हे आज औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या भेटीसाठी मुस्लिम समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. औवेसी यांच्या आराम कक्षाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झालेली होती. पण प्रत्येक कार्यकर्त्याला अकबरुद्दीन यांना भेटता येणं शक्य नाही. त्यामुळे पोलीस आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं. त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी बराच वेळ गोंधळ झाला. प्रवेश न दिल्यामुळे शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले. औरंगाबाद येथील सुभेदारी विश्राम गृह याठिकाणी अकबरुद्दीन ओवेसी आल्यानंतर संबंधित प्रकार घडला.
अकबरुद्दीन औवेसी मुस्लिम तरुणांमध्ये फार लोकप्रिय आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुण आले होते. त्यांना अकबरुद्दीन औवेसींना भेटायचं होतं. औवेसी सर्वच कार्यकर्त्यांना भेटू शकत नव्हते. त्यामुळे काही निवडक कार्यकर्त्यांना तरी भेटू द्यावं, असं त्यांचं म्हणणं होतं.
(संजय राऊत, प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार, 57 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर)
अकबरुद्दीन औवेसी यांना तेलंगणा पोलिसांची सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्याअवतीभोवती आधी तेलंगणा पोलीस होते. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस सुरक्षेसाठी तैनात होते. तेलंगणा पोलिसांनी मुस्लिम कार्यकर्त्यांना अकबरुद्दीन यांच्या भेटीसाठी त्यांच्या विश्रामगृहात घुसू दिलं नाही. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ढकलून दिलं. त्यामुळे कार्यकर्ते चिडले. अकबरुद्दीन औवेसींना एकदा प्रत्यक्षात पाहावं, भेटावं किंवा एखादा फोटो काढायला मिळावा, इतकीच कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र ते शक्य होऊ शकले नाही. आपण एवढ्या तडपत्या उन्हात आपल्या आवडत्या नेत्याच्या भेटीसाठी आलो असताना भेट होत नव्हती म्हणून काही कार्यकर्ते भिडले.
कार्यकर्ते संतापल्याने तेलंगणा पोलीस आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. वातावरणात तणाव निर्माण झाला. पण त्यावेळी काही तरुणांनी प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. यावेळी आक्रमक झालेले कार्यकर्ते पोलिसांना आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. आपण भर उन्हात औवेसींच्या भेटीसाठी लांबून प्रवास करुन आल्याचं ते म्हणत होते. पण तरीही पोलिसांनी कार्यकर्त्यांना औवेसींच्या भेटीसाठी विश्रामगृहात सोडलं नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. या दरम्यान गोंधळ झाला. पण कालांतराने तो गोंधळ निवळला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.