औरंगाबाद, 19 नोव्हेंबर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी खोतकरांवर गंभीर आरोप (Allegations) केले. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केला असा खळबळजनक दावा सोमय्यांनी केला आहे. तसेच खोतकरांनी शेतकऱ्यांनी दिलेली 1 हजार कोटी रुपयांची जमीन देखील बळकावण्याचा प्रयत्न केला, असा देखील आरोप सोमय्यांनी केला आहे.
किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?
“राज्य सरकारची 100 एकर जमीन बळकवण्याचा अर्जुन खोतकर यांचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांनी जी जमीन कारखान्यासाठी दिली आहे त्याची आज मार्केट वॅल्यू 1 हजार कोटींच्या आसपास आहे. साखर कारखाना तर कधी चालू झालाच नाही. कामगाराचे पैसेही दिले नाही. पण त्या जागेवर बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉम्पलेक्स बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. या संबंधी अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारी मी ईडीपासून राज्य मंत्रालयापर्यंत दिल्या”, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. तसेच खोतकरांनी रामनगर साखर कारखाना बेनामी पद्धतीने घेतला, असाही आरोप सोमय्यांनी यावेळी केला. हेही वाचा : आदित्य ठाकरेंसाठी सोडली जागा आता मिळाली आमदारकीची संधी, रामदास कदमांचा पत्ता कट “गेल्या आठवड्यात मी केंद्र सरकारचे सहकार सचिव विवेक अग्रवाल यांच्याकडे एक तक्रार सुपूर्द केली आहे. अर्जुन खोतकर यांचा 100 कोटींचा घोटाळा आणि 1 हजार एकर शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न याचा तपास सुरु झाला आहे”, असा दावा सोमय्यांनी केला.
‘अनिल देशमुखांना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी जेलमध्ये टाकले’
“माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच जेलमध्ये टाकले. हे दोघेही वसुलीचे काम करतात. धमकी कुणाला देताय शरद पवार साहेब? प्रदीप शर्मा, सचिन वझे जेलमध्ये आहेत. हे अधिकारी यांनीच नेमलेले”, अशा शब्दात किरीट सोमय्यांनी यावेळी टीका केली.
घोटाळेबाजांवर कारवाई होणारच, सोमय्यांचा इशारा
किरीट सोमय्या यांनी काल ट्विटरवर देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मी सांगतोय, धमक्यांना मी घाबरत नाही. जे घोटाळे तुम्ही चालवले आहेत त्या घोटाळ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असं सोमय्या ट्विटरवर म्हणाले होते.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 18, 2021
धमकी कोणाला !?
सुप्रिम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपाला की किरीट सोमैयांना !!?
फक्त अनिल देशमुख नाही, जितेंद्र आव्हाडांची पण अटक झाली, आनंद अडसूळ यांची पण अटक झाली
महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच pic.twitter.com/DDvbt8PTjb
“तुम्ही धमकी कुणाला देताय? सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ईडी, भाजपाला की किरीट सोमय्यांना तुम्ही धमकी देताय? महाराष्ट्राची साडेबारा कोटी जनता जागृत झाली आहे. फक्त अनिल देशमुखच नाही तर मंत्री जितेंद्र आव्हाड, आनंद अडसूळ यांनाही अटक झाली आहे. सगळ्या घोटाळेबाजारांवर कारवाई होणार”, असा इशारा सोमय्या यांनी दिलाय.