आज दिनांक 4 नोव्हेंबर 2021 तिथी अश्विन चतुर्दशी/अमावास्या. आज दिवाळी. सकाळी नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान आदी करून संध्याकाळी लक्ष्मी पूजन करावे. वर्षातील ही अमावास्या अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी घरात सर्वत्र स्वच्छता करून दीप उजळून फुलांचे तोरण लावावे. श्री लक्ष्मी ची यथायोग्य पूजा करावी. विशेष करून जिथे कचरा आहे तिथे दिवा लावावा.
श्री सूक्त म्हणून घरातील सोने, रोख रक्कम पूजेत ठेवावी.चांदी सोन्याची नाणी, लक्ष्मी चा फोटो, ठेवावा. घरातील सर्वानी नवीन वस्त्रे परिधान करून आनंदाने पूजा करावी. या दिवशी घरात कलह करू नये. घरातील पैसा सायंकाळी कोणाला देऊ नये.
व्यापारी वर्गाला हा दिवस आपल्या वही खात्याची पूजा करण्यासाठी योग्य मानला जातो. श्री लक्ष्मीला विशेष करून सुका मेवा, दही दूध, पंचामृत, लाह्या बत्तासे अर्पण करावे. सकाळी महा नैवेद्य करावा. तसेच लवंगा, विलायची, खव्याचे पदार्थ इत्यादी ,पाच प्रकारची फळे यांचा नैवेद्य दाखवावा. दान स्वरुपात कपडे किंवा मिठाई कामगार वर्गास द्यावी. ही दिवाळी सर्वानी प्रसन्न मनाने साजरी करावी. सर्वांना दीर्घायुष्य, श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा हीच शुभ कामना.
आज चंद्र दिवसभर तुला राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
आज श्री पूजन करण्यात वेळ आनंदात जाईल. दोघांनी जोडीने सर्व कार्य पार पाडावे व्यवसाय पूरक दिवस आहे. मतभेद कमी होतील. आर्थिक दृष्टय़ा उत्तम दिवस.
वृषभ
षष्ठ स्थानात चंद्र मंगळ अतिशय शुभ असुन वैचारिक, आर्थिक लाभ होतील. उसने देणे टाळा. दिवस समारंभ पूरक ,आनंदी आहे .नातेवाईकांना भेट द्याल. नोकरीत उत्तम दिवस.
मिथुन
राशीच्या पंचमात मंगळ रवि बुध चंद्र अत्यंत शुभ आहेत. उच्च प्रतीचे ज्ञान मिळावे म्हणून प्रयत्न करावा अध्यात्मिक अनुभव, सामाजिक पद ,प्रतिष्ठा मिळवून देणारा दिवस. संतती आनंदी राहील. शुभ दिवस.
कर्क
आज घरातल्या लक्ष्मी पूजन विधी मध्ये दिवस अतिशय आनंदात जाईल. मनापासून केलेल्या प्रार्थनेचे फळ देणारा दिवस आहे. घरात मिष्टान्न, उंची कपडे, वस्तू खरेदी होतील. आईवडील तुमच्यावर खूश राहतील. दिवस शुभ.
सिंह
आज कोणाकडे तरी उत्सवाच्या निमित्ताने जाणे होईल. भेटी, फोन, आनंदी वातावरण राहील. प्रवास सुखकर होतील. आर्थिक स्थिती सांभाळा. धन आगमन होईल पण खर्च देखील वाढेल. दिवस उत्तम.
कन्या
धन कुटुंब वाणी स्थानात होणारे चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार असून आर्थिक बाबतीत यश मिळवून देईल. अचानक लाभ होतील पण खर्च देखील वाढेल. कुटुंबात आनंदाचे क्षण येतील. शुभ दिवस.
तुला
आज राशीत आलेला चंद्र मंगळासोबत असून तुम्हाला मौज मजा करण्याची इच्छा होईल .पुजा अर्चना आरती यात रमून जाल.खरेदी होईल. लक्ष्मी कृपेने दिवस चांगला जाईल.
वृश्चिक
आज व्ययस्थानातील स्थानातील चंद्र मंगळ जरा जास्तीचा खर्च करतील. पण त्यात ही आनंद असेल. मनात असलेली चिंतेची छाया आज विसरून जा. ईश्वरी कृपा सर्व ठीक करेल. दिवस बरा जाईल
धनु
मंगळ बुध योग वाणीवर ताबा ठेवावा असे सुचवतो आहे. दिवसभर लाभाच्या अनेक संधी मिळतील. . नातेवाईकांच्या भेटी गाठी होतील. मित्र मैत्रिणींना भेट द्याल. आनंदात दिवस जाईल.
मकर
दशमातील सूर्य, मंगळ बुध, चंद्र ही ग्रहस्थिती वडीलधारी व्यक्ती लाभ करून देईल असे सुचवत आहे. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. एक आनंद देणारा दिवस. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला खूश कराल.
कुंभ
भाग्य स्थानात होणारी मंगळ बुध युती जपून राहण्याचा संकेत देत आहे. भाग्य स्थानातील चंद्र धार्मिक कार्य घडवून आणेल. संतती सुख चांगले. सुखद घटनांची सुरवात. दिवस शुभ.
मीन
चंद्र मंगळ अष्टमात असले तरी आज दिवस अनुकूल फळ देईल. थोडे मानसिक द्वंद्व चालू राहील प्रकृती जपून काम करा. श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. आर्थिक लाभ होतील. दिवस मध्यम .
शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Culture and tradition, Diwali 2021, Diwali-celebrations, Rashibhavishya