शवपेटीत श्वास घेत होती महिला (प्रतिकात्मक फोटो)
नवी दिल्ली 13 जून : देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. कित्येकदा लोक अशा घटनांमधून जिवंत बाहेर येतात, की ते बचावले कसे, असा प्रश्न सगळ्यांना पडतो. असंच एक प्रकरण इक्वाडोरमधील बाबाहोयो शहरातून समोर आलं आहे. एका वृद्ध महिलेला ब्रेन स्ट्रोकनंतर रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मृत्यूचं प्रमाणपत्रही दिलं होतं, पण घरी पोहोचल्यावर ती शवपेटीत श्वास घेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेला मोंटाया असे या 76 वर्षीय महिलेचे नाव असून तिला शुक्रवारी मार्टिन इकाजा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. ती पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होती. तिला काहीच बोलता येत नव्हतं. अवयव काम करत नव्हते. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना वाचवणं शक्य नाही असं वाटल्याने त्यांनी महिलेला मृत घोषित केलं. नातेवाईकांनी महिलेला शवपेटीत घरी आणलं. अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. मात्र शवपेटी उघडताच तिथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले. इथलं पाणी पाणी प्यायल्यानं होतो मृत्यू; जगातील सर्वात धोकादायक सरोवराचं रहस्य माहितीय का? ती महिला शवपेटीच्या आत श्वास घेत होती. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती महिला शवपेटीच्या आत दाखवण्यात आली आहे. तिच्या शेजारी असलेले दोन लोक तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर महिलेला पुन्हा त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ती सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहे.
मोंटाया यांचा मुलगा गिल्बर्ट बालबर्न म्हणाला, आम्ही शवपेटी उघडली तेव्हा श्वास सुरू असल्याचे आम्हाला दिसले. आम्ही लगेच त्यांना बाहेर काढले आणि दवाखान्यात धाव घेतली. माझी आई मेली नव्हती, तरीही आम्हाला मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले. प्रकरण इतके वाढले की इक्वाडोरच्या आरोग्य मंत्रालयाला प्रतिक्रिया द्यावी लागली. मंत्रालयाने सांगितले की जेव्हा मोंटाया पोहोचली तेव्हा तिच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून, जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा होईल. दुसरीकडे, महिलेचे सर्व अवयव आता प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या तिला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले असून प्रकृतीत सुधारणा झाल्यास तिला सोडण्यात येईल.