ज्या शेतात बिबट्याचा मृतदेह आढळला, तिथे आजूबाजूला कुठेही त्याच्या पायाचे ठसे नव्हते.
सृजित अवस्थी, प्रतिनिधी पिलिभीत, 16 जून : सध्याचा भीषण उकाडा आपल्यालाच नाही, तर प्राण्यांनाही सोसेनासा झाला आहे. आपण गरमीने हैराण झाल्यावर निदान थंडगार पाणी तरी पिऊ शकतो मात्र प्राण्यांना ते सहज मिळणं शक्य नाही. अशाच एका उकाड्याने हैराण झालेल्या बिबट्याने आपला जीव गमावला आहे. उत्तर प्रदेशच्या पिलिभीत व्याघ्र प्रकल्पालगत बिबट्याचा मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली होती. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचं कारण ऐकून वनविभागही हैराण झालं. मागील काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशच्या दूधवा राष्ट्रीय उद्यानात वाघ आणि बिबट्यांच्या सततच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. याप्रकरणी प्रशासनाकडून अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर आक्षेप घेत कारवाई करण्यात आली होती. अशातच 13 जून रोजी सकाळी पिलिभीत व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बैजूनगर गावातील जंगलापासून अवघ्या 15 मीटर अंतरावर एका शेतात बिबट्याचा मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तातडीने घटनास्थळ गाठलं. तपासणी केली असता बिबट्याच्या अंगावर कोणत्याही जखमा किंवा खुणा दिसल्या नाहीत. त्यामुळे हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा मोठा प्रश्न वनाधिकाऱ्यांपुढे होता. अखेर बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
शवविच्छेदन अहवालातून समोर आलं की, या बिबट्याचं वय जवळपास एक ते दीड वर्ष होतं. बिबट्याचं हे पिल्लू मृत्यूपूर्वी तब्बल 76 तास उपाशी होतं. शिवाय भीषण उकाडा असह्य झाल्याने त्याचा उष्माघाताचा बळी गेला. शवविच्छेदनाचा हा अहवाल वाचून वनाधिकारी अक्षरश: हळहळले. Anuradha nakshatra: अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव असा असतो, जाणून घ्या गुण-दोष महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतात बिबट्याचा मृतदेह आढळला, तिथे आजूबाजूला कुठेही त्याच्या पायाचे ठसे नव्हते. त्यामुळे वन्यजीवप्रेमींनी या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र या भागात पर्यटकांची वर्दळ असल्याने बिबट्याच्या पिल्लाचे ठसे पुसले गेले असावेत, असं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं.