लग्नाच्या वरातीतच चोरी
लखनऊ 24 जून : लग्न अतिशय थाटामाटात व्हावं आणि नेहमी आठवणीत राहावं, यासाठी लोक प्रत्यैक हौस पूर्ण करायचं बघतात. मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. मात्र काहीवेळा लग्नातच चोरी झाल्याच्या घटनाही समोर येतात. असंच एक हैराण करणारं प्रकरण आता उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातून समोर आलं आहे. यात काही चोरांनी वरातीलाच लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी चोरांनी वराच्या गळ्यात असलेला हारही खेचला. यानंतर काही वरातीतील लोकांजवळचं सामानही लुटलं. शेवटी एसडीएम आणि सीओ पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर प्रकरण शांत झालं. एवढंच नाही तर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात वरात घरापर्यंत पोहोचवली आणि लुटमारीच्या आरोपाखाली 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. मंडपातील हाणामारी पाहून लग्नातून पंडितच फरार; शेवटच्या क्षणी पोलिसांनी केलं चकित करणारं काम ही संपूर्ण घटना संभल जिल्ह्यातील हजरत नगर गढी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी याठिकाणी वाराही गावात वरात निघाली होती. याच गावातील एका मुलीच्या लग्नाची वरात रामपूर जिल्ह्यातील शाहाबाद तालुक्यातील नईम गंज गावातून आली होती. ही वरात नुकतीच गावात पोहोचली होती, इतक्यात वराच्या गाडीत काहीतरी बिघाड झाला. यामुळे नवरदेव खराब गाडीतून उतरून दुसऱ्या गाडीत बसणार होता.. इतक्यात काही जणांनी नवरदेव सोनूवर हल्ला केला. त्यांनी हल्ला करताच नवरदेवाच्या गळ्यातील सुमारे 22 हजारांच्या नोटांचा हार लुटून पळ काढला. हे सगळं पाहून वरातीत चेंगराचेंगरी होऊन गोंधळ उडाला. यासोबतच चोरांनी काही वरातीतील लोकांनाही लुटल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच एसडीएम सुनील त्रिवेदी आणि सीओ पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाची माहिती घेतली. पोलीस बंदोबस्तात वरात काढून लग्नाचे विधी पार पडले. याप्रकरणी नवरदेव सोनूने सांगितलं की, एका विशिष्ट समाजातील आरोपी तरुणांनी 22 हजारांच्या नोटांचा हार, गळ्यात घातलेली सोन्याची चेन आणि सोन्याची अंगठी लुटली आहे. या प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीश चंद्र यांनी सांगितलं की, वराच्या तक्रारीच्या आधारे पोलीस कारवाई करत आहेत. काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. गावात शांतता राखण्यासाठी खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच तपासही सुरू करण्यात आला आहे.