चोरांचा अजब कारनामा, ड्रायव्हिंग येईना, म्हणून 17 किमी ढकलत नेली गाडी, पाहा Video
कानपुर, 26 मे : चोरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, अनेकदा चोर गाडी चोरण्यासाठी मास्टर की वापरतात आणि लगेच पळून जातात. पण कानपूरमध्ये चोरीची अशी एक घटना समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. याघटनेत काही चोरट्यांनी मारुती व्हॅन चोरली पण गाडी कशी चालवायची हे कोणालाच माहित नसल्याने त्यांनी तब्बल 17 किलोमीटरपर्यंत गाडी ढकलून हा गुन्हा केला. त्यानंतर कर्तव्यावर असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्यांनी त्याला अडवले आणि हा गुन्हा उघड झाला. एसीपी नझिराबाद ब्रिज नारायण सिंह यांनी सांगितले की, 7 मे रोजी कानपूरच्या दाबौली परिसरातून 3 व्यक्तींनी ही मारुती व्हॅन चोरली होती. ज्यामध्ये पोलिसांनी सत्यम कुमार, अमन गौतम आणि अमित वर्मा यांना अटक केली आहे. सत्यम महाराजपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक. करत असून अमनदीप हा एस कॉलेजमध्ये बीकॉमच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. तर अमित एका इमारतीत काम करतो. तसेच, या तिघांनी ही मारुती कार चोरल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मात्र गाडी कशी चालवायची हे कोणालाच माहित नसल्याने या तिघांनी दाबौली ते कल्याणपूरपर्यंत ही गाडी ढकलून नेली.
आरोपींकडून पोलिसांच्या दोन मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरटयांनी यापूर्वी चोरीचे वाहन एका भंगार विक्रेत्याला विकण्याचा निर्णय घेतला होता. पण याशिवाय त्यांची आणखी एक हायटेक योजना देखील आखली होती. जर भंगार विक्रेत्याने ही कार घेतली नसती तर त्यांनी एक वाहन वेबसाइट तयार करून ते वाहन विकले असते.