नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : दिल्लीतील ‘बाबा का ढाबा’ (Baba Ka Dhaba) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता ‘बाबा का ढाबा’ ऑनलाईन फूड डिलिव्हरी ऍप ‘झोमॅटो’वर (Zomato) लिस्टेट करण्यात आला आहे. ‘बाबा का ढाबा’ची होम डिलिव्हरी होणार असून आता दिल्लीतील लोकांना घरबसल्या ‘बाबा का ढाबा’मधून जेवण मागवता येणार आहे. ‘झोमॅटो’ने ट्विट करत, ‘बाबा का ढाबा’ आता झोमॅटोवर लिस्टेड असून आमची टीम त्यांच्यासोबत काम करत असल्याची, माहिती दिली आहे. सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत होता. वृद्ध पती-पत्नी आपला संसार चालवण्यासाठी अनेक वर्षांपासून दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये ‘बाबा का ढाबा’ नावाने जेवणाचे पदार्थ बनवून विकण्याचं एक छोटसं दुकान चालवतात. पण लॉकडाऊन झालं आणि त्यांची कमाई पूर्ण बंद झाली. याचदरम्यान, एका यूट्यूबरने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ते वृद्ध पती-पत्नी, सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांच्या दुकानात कोणीही ग्राहक येत नसल्याचं सांगत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेक जण यांच्या मदतीसाठी पुढे आले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण विविध पद्धतीने त्यांच्या मदतीसाठी सरसावले असून आता ‘बाबा का ढाब्या’वर मोठी गर्दी पाहायला मिळतेय. सोशल मीडियाचा झालेला हा सर्वोत्तम वापर आणि त्याचा चांगला परिणाम असल्याची भावना नेटकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.