मांजर समजून घरी आणला भयानक प्राणी
चंदीगढ 16 जुलै : जंगलात भरपूर वेगवेगळे प्राणी आणि त्यांची पिल्लं असतात. कधी कधी तर मोठे तज्ज्ञही त्यांना ओळखू शकत नाहीत. नुकतीच अशीच एक घटना हरियाणातील एका कुटुंबासोबत घडली. झालं असं, की त्यांनी मांजरीचं पिल्लू म्हणून घरी जे आणले होतं ते प्रत्यक्षात मांजरीचं पिल्लू नसून बिबट्याचं पिल्लू होतं. नंतर जेव्हा त्यांना सत्य समजलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. सुदैवाने वनविभागाचं पथक योग्य वेळी तिथे पोहोचल्याने दोन्ही पिल्लांची सुटका करण्यात आली. पुढे दोन्ही पिल्लं त्यांच्या आईला भेटली. ही घटना हरियाणातील नूह जिल्ह्यातील आहे. येथील मेंढपाळाचं कुटुंब गुरे चारण्यासाठी जवळच्या जंगलात गेलं असता गुरुवारी ही घटना घडली. जंगलाला लागून असलेल्या कोटला गावच्या डोंगरावर बिबट्याची दोन पिल्लं दिसली. तेव्हा त्यांना ते मांजरीची पिल्लं असल्याचं वाटलं, कारण त्यावेळी आजूबाजूला कोणताही प्राणी दिसत नव्हता. ही पिल्लं तहानलेली आणि भुकेलेली दिसत होती. एवढंच नाही तर आजूबाजूला कुत्रे भुंकताना पाहून कुटुंबीयांनी त्यांना वाचवण्याच्या उद्देशानं त्यांना घरी आणलं. मांजरींना मायक्रोव्हेव्हमध्ये ठेवून द्यायचा त्रास, तरुणाचा धक्कादायक छंद; सत्य आलं समोर इकडे गावात आणून दोन्ही पिल्लांना दूध पाजलं आणि आजूबाजूचे लोक जमा झाले. तेव्हा कोणीतरी सांगितलं, की हे मांजरीचं पिल्लू नसून बिबट्याची पिल्लं आहेत. हे ऐकताच एकच खळबळ उडाली आणि लोकांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यास सुरुवात केली. तेव्हाच कोणाच्यातरी माहितीवरून वनविभागाचे पथकही पोहोचले. त्यांच्यासोबत पोलिसांचे पथकही होते. वनविभागाचे पथक तिथे पोहोचताच बिबट्याची दोन्ही पिल्ले जेरबंद करण्यात आली.
दोन शावकांपैकी एक नर तर दुसरं मादी असल्याचं सांगण्यात आलं. दोघांची यशस्वीरित्या सुटका केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शावकांना त्याच ठिकाणी सोडलं, जिथे ते गावकऱ्यांना सापडले होते. दरम्यान, दुसऱ्या एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, चांगली गोष्ट म्हणजे त्या दोन पिल्लांची आई त्या ठिकाणी आली आणि काही वेळातच आपल्या दोन्ही पिल्लांना घेऊन गेली.