इस्लामाबाद, 2 जानेवारी : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांच्या ड्रायव्हरने सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अब्जाधीश महिला व्यापारी सोबत लग्न (Marriage) केल्याचा दावा करणारी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या लग्नाच्या बाजूने आणि विरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. तर हा दुसऱ्या एका अरब लग्नातला व्हिडीओ आहे, असा दावा काही जणांनी केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी इम्रान खान यांचं ट्रोलिंग सुरु केलं आहे. कोण आहे महिला? या व्हिडीओमधील महिला सौदी अरेबियातील श्रीमंत व्यापारी परिवारातील असल्याचा दावा केला जात आहे. साहू बिंत अब्दुल्लाह अस महबूब असं त्यांचं नाव आहे. साहू यांचं मक्का आणि मदिना या शहरांसह फ्रान्स आणि अन्य देशांमध्ये हॉटेल तसंच मोठी संपत्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती 8 अब्ज डॉलर्स असल्याचा दावा केला जात आहे.
अर्थात ही घटना सत्य आहे की नाही याबाबत अजून नेमकी माहिती समजलेली नाही. काही वेबसाईटनं हे दोन अरब व्यक्तींमधील लग्न आहे, तसंच ती महिला सौदीमधील श्रीमंत व्यापारी नाही, असा दावा केला आहे. इम्रान खान ट्रोल या व्हिडीओनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. इम्रान खान यांचा एक जुना फोटो या निमित्तानं शेअर केला जात आहे. तेंव्हा त्यांनी सौदीच्या प्रिन्सची गाडी चालवली होती. मागच्या काही दिवसांमध्ये सौदी आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले आहेत. सौदी अरेबियानं पाकिस्तानला नव्यानं कर्ज देण्यासही नकार दिला आहे. त्याचबरोबर पूर्वी घेतलेलं कर्ज चुकविण्याची सूचना केली आहे. त्यानंतर सौदीचं कर्ज चुकवण्याचा पाकिस्तानवरचा दबाव वाढला आहे. भारतविरोधी भूमिकेचा फटका! सौदी अरेबियानं पाकिस्तानला 3 वर्षांसाठी 6.2 अब्ज डॉलर्सचं लोन दिलं होतं. त्यामध्ये 3 अब्ज डॉलर्सच्या रोख रकमेचा समावेश होता. तर 3.2 अब्ज डॉलरचं तेल आणि गॅसचा पुरवठा करण्यात येणार होता. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची काश्मीरच्या प्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्यामुळे 2021 च्या मुदतीचं कर्ज 2020 मध्येच खांबवलं होतं. त्यामुळे आता पाकिस्तान चीनकडून कर्ज घेत सौदीचं देणं फेडत आहे.