लखनऊ, 30 जानेवारी : महिलांविरोधात सातत्याने वाढणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी एक अनोख्या पद्धतीचा अवलंब केला आहे. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी महिलांच्या इच्छेचा सन्मान करण्यासाठी एका खास पद्धतीने जागरुकता पसरवत आहे. युपी पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात 90 च्या दशकातील हिट चित्रपट डर यामधील एका गाण्याची क्लिप आहे. तू हा कर या ना करत तू है मेरी किरण…या गाण्याचा वापर करण्यात आला आहे. त्यांनी ट्विटरवरच लोकांना प्रश्न केला की, किरणचा नकार म्हणजे?? या शिवाय या व्हिडीओमध्ये लोकांना ही बाब अधिक कळावी यासाठी अमिताभ बच्चन यांच्या पिंक चित्रपटाच्या डायलॉगचा वापर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात..नो मीन्स नो…जेव्हा एखादी महिला पुरुषाला कोणत्या गोष्टीचा नकार देते…नाही म्हणते..तेव्हा ते नाहीच असतं. अशावेळी पुरुषांनी महिलेचा पाठलाग करणं थांबवायला हवं.. हे लोकांना कळावं यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी हा प्रयत्न केला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेलं हे ट्विट पाहिल्यानंतर एका युजरने लिहिलं आहे की, नाही म्हणजे नाहीच असतं. तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, अशा प्रकारे लोकांना जागरुक करण्यासाठी तुमचे धन्यवाद. यापूर्वीही यूपी पोलिसांनी अनेक मुद्द्यावर लोकांची समजूत काढण्यासाठी यासारख्या अनोख्या पद्धतीचा अवलंब केला आहे.