विमानाने घेतला पेट
नवी दिल्ली 09 मे : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. परंतु यात काही व्हिडिओ असेही असतात, जे वापरकर्त्यांना विचलित करतात. हे व्हिडिओ बहुतांशी कोणत्याही रस्त्यावरील अपघात किंवा अपघातग्रस्त विमान तसंच ट्रेनशी संबंधित असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये एका विमानाला भीषण आग लागली आहे आणि लोक त्याच्या आतून बाहेर पडत पळताना दिसत आहेत. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये धावपट्टीवर एक विमान उभं असून त्याला भीषण आग लागल्याचं दिसत आहे. ही आग त्या विमानाच्या मागील भागातच लागली आहे. व्हिडिओ पाहून असं वाटतं की, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं असून यादरम्यान विमानाला आग लागली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, प्रवासी विमानाच्या समोरील बाजूकडून बाहेर पडत पळत आहेत.
या जळत्या विमानाच्या पुढील भागाचं इमर्जन्सी गेट उघडं असून प्रवासी तिथून वेगाने खाली उतरून जीव वाचवण्यासाठी धावत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @ViciousVideos नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ही घटना कुठे घडली आणि हा व्हिडिओ कधीचा आहे याची माहिती पोस्टमध्ये देण्यात आलेली नाही.
हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 1 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. या प्रवाशांच्या सामानाचं काय झालं? असा सवाल अनेकांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे.