बिबट्यासोबत भिडला पिता (प्रतिकात्मक फोटो)
लखनऊ 06 जुलै : आपल्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी एक वडील बिबट्यासोबत भिडल्याची घटना समोर आली आहे. अखेर या लढ्यानंतर वडिलांनी आपल्या 4 वर्षीय लेकीला बिबट्याच्या जबड्यातून जिवंत परत आणलं. त्यानंतर वनविभागाने 10 हजारांची मदत जाहीर केली. ही घटना उत्तर प्रदेशातील बहराइच येथील कतर्निया घाट क्षेत्राशी संबंधित आहे. घटनेत जंगलातून भटकत आलेल्या एका भयंकर बिबट्याने तनाजा गावातील एका घरात अचानक घुसून घराच्या आतील खाटेवर झोपलेल्या सुहानी नावाच्या 4 वर्षाच्या मुलीला जबड्यात पकडून पळ काढला. त्यानंतर मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील रामबक्ष घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीला वाचवण्यासाठी बिबट्याशी झुंज दिली. यानंतर बराच वेळ बिबट्या आणि मुलीच्या वडिलांमध्ये संघर्ष सुरू होता. अखेर लोकांचा आवाज ऐकून बिबट्याने आपलं भक्ष्य जागेवरच सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात मुलीच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. वडिलांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. वनविभागाने मुलीच्या वडिलांना 10 हजार रुपयांची मदत दिली आहे. Leopard attack : गंगापूरमध्ये महिलेने बकरी समजून बिबट्यालाच कानफाडलं; सत्य समोर आल्यानंतर… 4 वर्षाच्या मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना मोतीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील तनाजा गावातील आहे. सुहानी असं या घटनेत जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे. तिचे वडील रामबक्ष हे शेतीची कामं करतात. रामबक्ष यांनी सांगितलं की, सकाळी त्यांची मुलगी अंगणातील कॉटवर झोपली होती. पत्नी घरकाम करत होती. मी खोलीत काम करत होतो. अचानक मुलीच्या रडण्याचा आवाज आला. मुलीच्या वडिलांनी पुढे सांगितलं की, मी धावतच अंगणात पोहोचलो तेव्हा मला दिसलं की बिबट्याने मुलीला तोंडात धरलं आहे. मी काहीही विचार न करता बिबट्यावर उडी मारली. यानंतर या पित्याने बिबट्याशी झुंज देत त्याच्या मुलीला बिबट्याच्या तोंडातून हिसकावलं. यानंतर बिबट्याने रामबक्ष यांच्यावरही हल्ला केला. दरम्यान, त्यांनी जवळ ठेवलेली काठी उचलली आणि बिबट्याला मारायला सुरुवात केली. त्यांनी पुढं सांगितलं की, चकमकीत बिबट्याने त्यांच्यावर अनेकदा हल्ला केला, पण ते घाबरलो नाही. सुमारे 5 मिनिटं बिबट्याने त्याच्यावर असाच हल्ला केला आणि ते आपला बचाव करत राहिले. यानंतर बिबट्याने मुलीला तिथेच सोडून जंगलाकडे धाव घेतली. मग ते आणि त्यांची पत्नी मुलीसह मिहीनपुरवा सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तिथे मुलीवर आणि त्यांच्यावर उपचार केले.