अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 24 जून : गेल्या काही वर्षांपासून वन्यजीव आणि मानवाचा संघर्ष वाढत चालला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर यातून काहीजण थोडक्यात वाचलेही आहेत. अशीच एक घटना गंगापूर तालुक्यात घडली आहे. शेडमधील बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर महिलेने थेट बिबट्याशी झुंज दिली. या घटनेत महिला थोडक्यात वाचली आहे. मात्र, यात एका बकरीचा मृत्यू झाला आहे. बकरी म्हणून बिबट्यालाच फटकावलं गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मधुकर लांडे यांच्या शेतवस्तीवर रात्री साडेआठच्या सुमारास बकरी बांधण्याच्या शेडमध्ये बिबट्या शिरला. बिबट्याला पाहाताच बकऱ्यांनी आरडाओरड सुरू केली. बकऱ्यांचा आवाज बाजूलाच राहत असलेल्या महिलेला ऐकू गेला. तिने शेडमध्ये जाऊन दोन्ही बकऱ्याचे भांडण चालू असल्याचे समजून बिबट्याला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याचा कान धरून त्याच्या डोक्यावरही चापटा मारल्या. महिलेचा आणि बिबट्याचा सर्व खेळ दोन ते तीन मिनिट सुरू होता. बिबट्या शिकारीमध्ये असल्यामुळे बिबट्याने महिलेकडे दुर्लक्ष केलं. शिकार झाल्यानंतर महिलेला जेव्हा बिबट्या असल्याचे लक्षात आले त्यानंतर महिलेने आरडाओरड केली. महिलेचा आवाज ऐकून बिबट्याने तिथून धूम ठोकली. तोपर्यंत बिबट्याने एका बकरीची शिकार केली होती. या घटनेने महिलेचा चांगलाच थरकाप ऊडाला. या संपूर्ण घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे महिलेचेदेखील कौतुक होत आहे. वन विभाग अधिकारी आणि पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. वाचा - तहसील बांधकामाचे खोदकाम करताना सापडली धक्कादायक गोष्ट; तालुक्यात खळबळ बिबट्यांचे हल्ले वाढले गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवळ येथे एका शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर मजुराच्या ओरडण्याचा आवाज आल्याने लोकांनी मदतीसाठी धाव घेत बिबट्याला काठ्यांच्या सहाय्याने पिटाळून लावले. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात एक तरुणी आणि तिचे मोठे दोन भाऊ कुणाल भाऊसाहेब गागरे पाटील आणि तेजस भाऊसाहेब गागरे पाटील हे लोणीहून फोटो जर्नलिस्ट दत्तात्रय नामदेव विखे पाटील या त्यांच्या मामाच्या घरून वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून निघाले होते. कानडगावला घराच्या अगदी जवळ आल्यावर गिन्नी गवतातून बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यामुळे ते तिघेही मोटरसायकलवरून खाली पडले. मात्र, प्रसंगावधान दाखवून तरुणीने बिबट्यावर माती आणि दगडाने हल्ला केल्याने ते तिघेही वाचले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.