पियुष शर्मा, प्रतिनिधी मुरादाबाद, 7 जून : कोणी प्रेमविवाह करणं पसंत करतं तर, कोणी घरच्यांच्या संमतीने विधिवत लग्न करणं पसंत करतं. परंतु लग्न कसंही झालं तरी अनेकदा दोन कुटुंबांमध्ये कोणत्या ना कोणत्या लहान-मोठ्या गोष्टीवरून भांडण होतंच होतं. अशी अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी लग्न असतात ज्यात पहिल्या बोलणीपासून पाठवणीपर्यंत सर्वकाही शांततेत पार पडतं. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील एका गावात तर एक लग्न असं झालं की, ज्याची चर्चा अख्ख्या जिल्ह्यात पसरली. या लग्नाची गोष्ट ऐकून लोकांनीही तोंडावर हात ठेवले. प्रत्यक्षात लग्न पाहिलं तेही आश्चर्यचकीत झाले. त्याचं झालं असं की, जिल्ह्याच्या कुंदरकी भागातील चकफजालपूर गावात सोमवारी रात्री चक्क वधू-वराच्या कुटुंबियांमध्ये हाणामारी झाली. प्रकरण पोलीस स्थानकात पोहोचलं. तर, चारजण रुग्णालयात दाखल झाले. मात्र सकाळ होताच दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने वधू-वराने लग्नगाठ बांधली आणि वधूची आनंदात पाठवणीही झाली.
मझोला भागातील खुशहालपूर येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचं आपल्या मावशीच्या नवऱ्याच्या नात्यात असलेल्या तरुणीवर प्रेम जडलं. तरुणीनेही त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. दोघं प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोघांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला याचा थांगपत्ता नव्हता. सोमवारी रात्री दोघांना एकमेकांवाचून करमेच ना. मग काय…हा तरुण मागचा पुढचा विचार न करता थेट तिच्या घरी चकफजालपूरला दाखल झाला. दोघं खूप दिवसांनी एकमेकांना भेटले, परंतु त्यांचं दुर्दैव असं की तरुणीच्या कुटुंबातील एका वक्तीने त्यांना रंगेहात पकडलं. मग थोड्याच वेळात कुटुंबातील सर्वांना हे प्रेमप्रकरण समजलं. तेव्हा ताबडतोड मुलाच्या कुटुंबियांनाही तिथे बोलावून घेण्यात आलं. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये प्रचंड मोठं भांडण झालं. एकमेकांवर लाठीमार करण्यात आला. भांडण बघायला गावकऱ्यांनीही मोठी गर्दी केली होती. प्रकरण एवढं टोकाला गेलं की, 4 जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि हे प्रकरण पोलीस स्थानकात पोहोचलं. Sonnalli Seygall Wedding : लग्न अभिनेत्रीचं चर्चा मात्र तिच्या कुत्र्याची; ‘प्यार का पंचनामा’ फेम सोनालीची मंडपात दमदार एंट्री परंतु पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत सकाळ झाली होती आणि वातावरणही शांत झालं होतं. गावकऱ्यांनी बैठक बसवून हे प्रकरण सोडवलं होतं, दोन्ही कुटुंबियांना समजवलं होतं. मग या तरुण-तरुणीचं लग्न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळचं चामुंडा देवी मंदिर सजवून, नातेवाईकांना बोलवून हे लग्न शांततेत पार पडलं. शिवाय लग्नात भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. वधूच्या भावंडांनी तिची आनंदांत, भरल्या डोळ्यांनी पाठवणी केली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारी दोन्ही कुटुंबीयांनी मागे घेतल्या आहेत. तर चार जखमीही आता सुखरूप आहेत. परंतु संपूर्ण जिल्ह्यात मात्र या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.