प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 22 फेब्रुवारी : ग्रामीण भाग तसेच शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अलीकडच्या काळात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलं गंभीर जखमी झाल्याचं किंवा त्यांचा बळी गेल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. भटक्या कुत्र्यांमुळे वाहनचालकांचे अपघातदेखील होत आहेत. गुजरातमध्ये अशाच प्रकारची पण काहीशी विचित्र घटना नुकतीच घडली. मुलाला कुत्रा चावल्याने भटक्या कुत्र्यांना अन्न देऊ नये, अशी विनंती एका महिलेनं एका श्वानप्रेमी महिलेला केली. पण यामुळे श्वानप्रेमी महिला संतापली आणि तिनं त्या महिलेच्या बोटाचा चावा घेतला आणि तिला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हे ही पाहा : Viral Video : झेब्रावर हल्ला करणं मगरीला पडलं महागात, क्षणात गेम फिरला आणि… सीता झाला या खेडा जिल्ह्यातील नाडियाड तालुक्यातील कमला गावातील रहिवासी असून, या महिलेने भावना रावल या महिलेविरुद्ध वासो पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भावन रावलने आपल्यावर रविवारी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप सीता झाला यांनी केला आहे. ``माझ्या पतीचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे. मी माझा मुलगा यज्ञेश (वय 26) आणि प्रकाश (वय 22) यांच्यासोबत राहते. मी नाडियाडतील एका लाकडाच्या गोदामात काम करते,`` असं सीता झाला यांनी पोलिसांना सांगितलं. एका भटक्या कुत्र्याने मुलाचा चावा घेतल्यानंतर सीता झाला यांनी मुलावर उपचार केले आणि नंतर त्यांना या घटनेचा विसर पडला. सुमारे एक आठवड्यानंतर 45 वर्षांच्या भावना रावल या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताना झाला यांनी पाहिलं. ही भटकी कुत्री असल्याने त्यांना खाऊ घालू नये, असं झाला यांनी रावल यांना सांगितलं. त्यानंतर झाला यांनी ही बाब गावकऱ्यांना सांगितली. पण या श्वानप्रेमी महिलेनं सीता झाला यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रावल यांनी झाला यांच्या बोटाचा जोरात चावा घेतला. यामुळे बोटातून रक्तस्त्राव सुरू झाला. तसंच भावना रावल आणि त्यांच्या पतीनं काठीनं मारहाण केल्याचा आरोप सीता झाला यांनी केला आहे. या घटनेनंतर सीता झाला यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीता झाला यांना शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून, त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन कवटीला फ्रॅक्चर झालं आहे. ``रविवारी रात्री मी घराजवळ कामाच्या ठिकाणी असता रावल या एका भटक्या कुत्र्याला खायला देत असल्याचं मी पाहिलं. आठवडाभरापूर्वीच या कुत्र्याने माझा मुलगा प्रकाश याचा चावा घेतला होता. त्यामुळे मी रावल यांच्याजवळ गेले. या कुत्र्याने माझ्या मुलाचा चावा घेतला आहे, त्यामुळे त्याला खायला देऊ नये, असं मी रावल यांना सांगितलं. माझं बोलणं त्यांना आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, ``असं झाला यांनी सांगितलं. या दरम्यान रावल आणि त्यांचे पती कमलेश यांनी माझ्यावर हल्ला करून मला काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोपही झाला यांनी केला आहे. ``मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी माझा हात दाबला. त्यानंतर भावना यांनी माझ्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला. त्यामुळे माझ्या अंगठ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि मी जमिनीवर कोसळले.
त्यानंतर रावळ दाम्पत्याने मला काठीने बेदम मारहाण केली आणि मी बेशुद्ध पडले,`` असं झाला यांनी पोलिसांना सांगितलं. कोणीतरी या भांडणाविषयीची माहिती यज्ञेशला दिली आणि तो आईच्या बचावासाठी धावत आला. ``आईला ठार मारण्याची धमकी देऊन रावल दाम्पत्य तेथून निघून गेलं,`` असं यज्ञेशने सांगितलं. वासो पोलिसांनी फरार असलेल्या रावल दाम्पत्याविरुद्ध गंभीर दुखापत करणे, चिथवणे, धमकवणे आणि अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणचा अधिक तपास सुरू आहे.