हिंदू पद्धतीत सात फेरे पूर्ण केल्याशिवाय कोणतंही लग्न पार पडत नाही. शिवाय यातील प्रत्येक फेरीचा एक अर्थ असतो.
नीरज कुमार, प्रतिनिधी बेगुसराय, 11 जून : भारतीय संस्कृतीत लग्नाशी संबंधित अनेक प्रथा आहेत. हिंदू पद्धतीत सात फेरे पूर्ण केल्याशिवाय कोणतंही लग्न पार पडत नाही. हे सात फेरे हिंदू विवाहाचा मुख्य आधारस्तंभ मानले जातात. शिवाय यातील प्रत्येक फेरीचा एक अर्थ असतो. परंतु बिहार राज्यातील बेगुसराय जिल्ह्यात पार पडलेल्या एका लग्नात वधू-वराने चक्क आठ फेरे घेतले. हे पाहून वऱ्हाडीही आश्चर्यचकीत झाले. परंतु त्यामागील कारण ऐकून सर्वांनीच वधू-वराचं कौतुक केलं, त्यांना शाबासकी दिली. हा आठवा फेरा समाजात रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी होता. शिवाय विवाह संपन्न झाल्यानंतर लग्नात उपस्थित राहिलेल्या सर्वांना रक्तदानाची शपथही देण्यात आली. लग्नमंडपात ‘रक्तदान श्रेष्ठदान’, असे रक्तदानाबाबत जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात आले होते. पूजा आणि सुधांशूच्या या लग्नाची अख्ख्या जिल्ह्याभरात चर्चा झाली. वनद्वार गावात हे लग्न अतिशय दिमाखात पार पडलं.
लग्न पार पडल्यावर वधू-वरांसमोर सुमारे 500 वऱ्हाड्यांनी रक्तदान करण्याची शपथ घेतली. या 500 जणांपैकी 100 जणांनी जरी रक्तदान केलं तरी ही मोहीम यशस्वी मानली जाईल, असा विश्वास वधू-वराने व्यक्त केला. वधू पूजा म्हणाली, ‘रक्ताच्या कमतरतेमुळे बेगुसरायमध्ये अनेक बालकं आपला जीव गमावतात. त्यामुळे आम्ही समाजाला जागृत करण्यासाठी हे पाऊल उचललं.’ तर सुधांशू कुमार याने सांगितलं की, त्यांनी स्वतः आतापर्यंत 10 वेळा रक्तदान केलं आहे. अशक्तपणामुळे बालकांचा मृत्यू होऊ नये म्हणून आम्ही अशाप्रकारे लग्नसोहळ्याच्या माध्यमातून लोकांना संदेश द्यायचं ठरवलं. स्वतःशीच लग्न करून तिनं काय केलं? Kshama Bindu ने Wedding Anniversary ला शेअर केले ‘ते’ VIDEO दरम्यान, वधूचा भाऊ विक्रम कुमार हा जयमंगला वाहिनी रक्तदान सेवा समितीचा सदस्य आहे. या समितीच्या सदस्यांनी लग्नमंडपात रक्तदानाबाबत जनजागृती करणाऱ्या घोषणा दिल्या. ‘आज जिल्ह्यात 65 बालकं रक्ताच्या कमतरतेने त्रस्त आहेत. या निष्पाप बालकांना जीवनदान देण्यासाठी हा एक उत्तम उपक्रम ठरला आहे’, असं या सदस्यांनी म्हटलं.