पनामा, 22 एप्रिल: कारागृहात तस्करीच्या अनेक घटना आपण पाहतो. परंतु पनामा (Panama) याठिकाणी ड्रग्ज तस्करीची (Drugs Smuggling) एक विचित्र घटना नुकतीच घडली. येथे अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी चक्क मांजरीची (Cat) मदत घेण्यात आली. मात्र मांजरीच्या गळ्यात अमली पदार्थ बांधून ते कारागृहात (Prison) पोहोचवण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे फसला. पनामा येथील कारागृहात ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न करणारं एक मांजर अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. एनवाय पोस्टच्या वृत्तानुसार, शुक्रवारी 16 एप्रिलला राजधानी पनामा शहराच्या उत्तरेस असलेल्या प्रांतातील न्यूझहा एस्पेरेंझा कारागृहाबाहेर शरीरावर एक ड्रग्जची थैली घेऊन जाणारं हे मांजर अधिकाऱ्यांनी पकडलं आहे. 1700 पेक्षा जास्त कैदी असणाऱ्या या कारागृहात जाऊ पाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र मांजरीच्या गळ्यात एक कापड बांधले होते. याबाबत पनामा तुरुंग यंत्रणेचे प्रमुख अड्रेस गुट्टीरेज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अनाहूत अशा या तस्कराच्या गळ्याला कापड बांधले होते. पांढरी पावडर, व्हेजिटेबल मॅटर आणि काही पानं यांचे पॅकेटस या कापडात लपेटलेले होते. हे पदार्थ गांजा (Marijuana) आणि कोकेन (Cocaine) असण्याची शक्यता आहे, असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. (हे वाचा- ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी टाटा समूहाने केली मोठी घोषणा, मोदींनी केलं कौतुक ) मादक द्रव्यांच्या तस्करीसाठी पाळीव प्राण्यांचा वापर करणे ही दुर्मिळ अशी घटना आहे. अशी घटना यापूर्वी नोंदवली गेल्याचे ऐकिवात नाही. या गुन्हेगाराला पाळीव प्राणी दत्तक केंद्रात हलवण्यात येईल, असं फिर्यादी एडुआर्डो रॉड्रीग्ज यांनी सांगितलं. तुरुंगात अवैधरित्या पदार्थ आणण्यासाठी प्राण्यांचा वापर करण्यात आल्या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आल्याचे स्थानिक वकिलांनी सांगितले. ते म्हणाले की एकदा प्राण्याजवळ बाहेरील लोकांनी ड्रग्ज दिले की कैदी त्या प्राण्याला आमिष दाखवण्यासाठी अन्नाचा वापर करतात आणि ड्रग्ज हस्तगत करतात. या गुन्हेगार मांजरीची छायाचित्रे कोलनच्या ड्रग्ज प्रॉसिक्युटर कार्यालयाने ट्विटरवर (Twitter) शेअर केली आहेत.
अहवालानुसार, पनामा कारागृहात सध्या मोठ्या प्रमाणात कैदी असून त्यांची संख्या सुमारे 1800 आहे. या कैद्यांना कारागृहातील 23 सेल्समध्ये ठेवण्यात आले आहे. असामान्य अशा मार्गाने तस्करी करण्याची ही पहिली घटना नाही. मध्य अमेरिकेत मादक पदार्थांच्या (Narcotics) तस्करीसाठी अनेकदा प्राण्यांचा त्यातही मांजरीचा वापर कैद्यांनी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीसाठी ड्रोन आणि कबुतराचा वापर करण्याची पध्दतही येथे अवलंबली जाते. यातील बहुतांश घटना संबंधित अधिकाऱ्यांनी रोखलेल्या आहेत. ही स्टोरी सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल झाली आहे. यावर नागरिकांनी हास्यास्पद प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. तसेच अनेक जणांनी आश्चर्य व्यक्त करीत या किट्टीच्या नशीबी काय आले अशा स्वरुपाच्या कॉमेंट केल्या आहेत.