मुंबई बेस्ट बस
मुंबई, 14 फेब्रुवारी : मुंबईतील अंतर्गत प्रवासी वाहतुकीमध्ये बेस्ट (बीईएसटी) बस सेवेचा मोठा वाटा आहे. या सेवेमध्ये आता आधुनिक गाड्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत बेस्टनं सोमवारी (13 फेब्रुवारी) आपल्या ताफ्यात नवीन इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेसचा समावेश केला आहे. याशिवाय, नागरिकांच्या मागणीमुळे वरच्या डेकवर एक अतिरिक्त फ्रंट-रो सीट देण्यात आलं आहे. जुन्या डबल-डेकरमध्ये पुढच्या रांगांतील सीट्सची खूप मागणी होती. कारण, या रांगांतील सीट्सना पूर्वीपासून ‘नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू’ मिळालेली आहे. पाच किलोमीटर अंतरासाठी बसचे किमान भाडे 6 रुपये असणार आहे. बस रस्त्यावर आल्याच्या पहिल्या दिवसापासून नफा कमावण्यासंबंधी जो आर्थिक करार करण्यात आला आहे, त्या कराराअंतर्गत सुरू होणारी ही पहिलीच बस असेल. बेस्ट दररोज एका गाडीसाठी प्रति किलोमीटर 56 रुपये भाडं देईल आणि दररोज 75 रुपये प्रति किलोमीटर कमावेल असा अंदाज आहे, असं बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितलं आहे. नवीन बसच्या प्रोटोटाइपला प्रमाणपत्र मिळालं असून, बस आरटीओमध्ये नोंदणीकृत झाली आहे. सोमवारपासून (13 फेब्रुवारी) ही बस रस्त्यावर धावू लागली आहे. यानंतर आणखी ई-डबल-डेकर बसचा बेस्टमध्ये समावेश केला जाणार आहे. अगोदर कुर्ला-बीकेसी मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात ई-डबल-डेकर बस धावेल. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस आणखी पाच बसेस आपल्या ताफ्यात दाखल करण्याची योजना बेस्टनं आखली आहे. चंद्रा म्हणाले, “आम्हाला मार्च महिन्यापर्यंत आणखी 20 बसेस आणि येत्या काही महिन्यांत एकूण 200 ई-डबल-डेकर मिळतील.” या वर्षाच्या अखेरीस आणखी एक ऑपरेटर 700 ई-डबल-डेकर बस रस्त्यावर उतरवेल, अशी अपेक्षा आहे. प्रवाशांना वरच्या डेकवर उभं राहून प्रवास करावा लागणार नाही, याची काळजी बेस्ट घेणार आहे. चंद्रा म्हणाले की, चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी टॅप-इन व टॅप-आउट सुविधांसह 100 टक्के डिजिटल इंटरनॅशनल स्टँडर्स असलेली बस तयार करण्याचा बेस्टचा मानस आहे. ‘चलो मोबाइल अॅप’ किंवा स्मार्ट कार्डच्या मदतीनं टॅप-इन व टॅप-आउट केलं जाऊ शकतं. बेस्ट काही दिवसांत स्वतःचं नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सादर करणार आहे आणि दोन लाख प्रवाशांना ते मोफत मिळणार आहे. भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस असलेल्या या बसमध्ये सहज प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी दोन जिने आहेत. अनेक प्रवाशांनी कंडक्टरला रोख पैसे देऊन तिकीट खरेदी करण्यासाठी व त्यानंतर बसमध्ये चढण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. पाच किलोमीटर अंतरासाठी किमान सहा रुपये तिकीट आकारलं जाणार आहे. जे जनतेला परवडणारं असेल. “गेल्या वर्षी आणलेल्या बसमध्ये वरच्या डेकवरील चार ‘प्रीमिअम फ्रंड रो सीट्स’पैकी समोरच्या जिन्याकडे जाण्यासाठी असलेल्या दोन सीट्स काढण्यात आल्या होत्या. पण, या जागांसाठी प्रवाशांकडून होणारी मागणी वाढली होती. म्हणूनच बस निर्मात्यानं जिना चढताना एक अतिरिक्त फ्रंड रो सीट समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं चंद्रा यांनी सांगितलं. हे वाचा - एकापाठोपाठ 15 सिलेंडर फुटले, पत्रा मानेतच घुसला, 14 वर्षांचा मुलगा जिवाशी गेला बसमध्ये पायऱ्यांच्या डिझाइनसह इतर काही बदल करण्यात आले आहे. याबाबत चंद्रा म्हणाले की, नवीन बस रस्त्यावर सिंगल-डेकरइतकीच जागा व्यापते. मात्र, त्यातील प्रवासी संख्या जवळजवळ दुप्पट आहे. पीक अवर्समध्ये ही बस एकाच फेरीत 80 ते 90 प्रवासी घेऊन जाऊ शकते. हे वाचा - एकटेपणाला कंटाळला? सातव्या मजल्यावरुन उडी घेत मुंबईत IIT च्या विद्यार्थ्याचं…. या बहुचर्चित बसेस चार महिन्यांपूर्वीच सुरू होतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना उशीर झाला. याबद्दल विचारलं असता, महाव्यवस्थापक म्हणाले, “प्रमाणीकरणासाठी (सरकारी-अधिकृत एजन्सीद्वारे) नियमांमध्ये बदल करण्यात आले होते. त्यामुळे प्रक्रियेस विलंब झाला”. “बेस्ट या वर्षी खालच्या डेकमध्ये एसीसह 50 ओपन-डेक डबल-डेकर, दोन हजार 100 सिंगल-डेकर बसेस, 900 ई-डबल-डेकर आणि 500-1,000 प्रीमिअम बसेस सादर करणार आहेत. ठाणे ते पवईपर्यंत आणि मीरा रोड ते दहिसर मेट्रोपर्यंत दोन प्रीमिअम बसेस या आठवड्यात सुरू करण्यात आल्या आहेत,” अशी माहिती चंद्रा यांनी दिली.