नवी दिल्ली, 15 एप्रिल : कोरोना संकटामुळे देशातील अनेक नागरिक आरोग्य समस्यांसह, आर्थिक समस्यांचाही सामना करत आहे. यातच बँकिंग ऑनलाईन फ्रॉडच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत असून सायबर गुन्हेगार फ्रॉडसाठी विविध मार्गांचा वापर करत आहेत. हीच बाब लक्षात घेता, पोलिसांनी ऑनलाईन बँक फ्रॉड झालेल्यांच्या मदतीसाठी एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. या नंबरवर तक्रार दाखल केल्यानंतर काही मिनिटांतच फ्रॉडद्वारे गेलेली अमाउंट परत मिळण्यास मदत होणार आहे. हा आहे हेल्पलाईन नंबर - केंद्रीय गृह मंत्रालय सर्व प्रकारच्या सायबर क्राईमसाठी 155260 हा हेल्पलाईन क्रमांक ऑपरेट करतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने केंद्रीय गृह मंत्रालयासह मिळून या हेल्पलाईन क्रमांकला अधिक सक्षम बनवण्यासाठी पायलट बेसिसवर काम सुरू केलं होतं. दिल्ली पोलिसांनी यात आणखी 10 लाईन्स जोडल्या आणि त्याला जबरदस्त रिस्पॉन्सही मिळाला. सायबर सेलचे पोलीस उपायुक्त अनेश रॉय यांनी सांगितलं की, यामुळे जवळपास 23 लोकांना त्यांचे फ्रॉडमध्ये गेलेले पैसे परत मिळाले आहेत. 23 लोकांना जवळपास 8.11 लाख रुपये परत करण्यात आले. यात सर्वात मोठी रक्कम दिल्लीत राहणाऱ्या एका रिटायर्ड ऑडिट अकाउंट ऑफिसरची होती, ज्यांच्या अकाउंटमधून 98000 रुपयांचा फ्रॉड झाला होता.
असं काम करतो हेल्पलाईन क्रमांक - केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलद्वारा 155260 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. तुमचे पैसे ज्या खात्यातून किंवा ज्या आयडीवर ट्रान्सफर करण्यात आले होते, त्या बँकेला किंवा ई-साईटला अलर्ट मेसेज पाठवला जातो. त्यानंतर तुमची रक्कम होल्ड होते.
- जर ऑनलाईन बँकिंग फ्रॉड झाला, तर तुम्हाला सर्वात आधी हेल्पलाईन नंबर 155260 वर कॉल करावा लागेल. त्यानंतर प्राथमिक चौकशीनंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर, फ्रॉड झाला त्यावेळचं टायमिंग, बँक अकाउंट नंबर मागितला जाईल.
- त्यानंतर हेल्पलाईन नंबर तुमची ही माहिती पुढील कारवाईसाठी पोर्टलवर पाठवते. तसंच संबंधित बँकेला फ्रॉडबाबतची माहिती दिली जाते. माहिती वेरिफाय झाल्यानंतर फ्रॉड झालेली रक्कम होल्ड केली जाते. त्यानंतर तुमची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होते.