नवी दिल्ली, 22 एप्रिल : सध्या एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना गुगल मॅप्स (Google Maps) अतिशय महत्त्वाचं अॅप ठरत आहे. गुगल मॅप्स त्या ट्रॅव्हलर्ससाठी अतिशय फायदेशीर आहे, जे वेळ न घालवता अनेक ठिकाणी प्रवास करतात. कंपनी नेहमी युजर्ससाठी नवनवे अपडेट मॅप्समध्ये जोडत असते, ज्यामुळे हे अॅप युजर्ससाठी अधिक सहज-सोपं झालं आहे. परंतु आता कंपनीने एका नव्या फीचरसाठी निर्णय घेतला आहे. Autoevolution रिपोर्टनुसार, गुगल आता आपल्या अल्गोरिदममध्ये बदल करणार आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मॅप सुरू केल्यानंतर, गुगल सर्वात वेगवान मार्ग अर्थात फास्टेस्ट रुट दाखवायचा आणि युजर्स आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचे. परंतु आता कंपनी हे फीचर हटवणार आहे. म्हणजेच आता गुगल मॅप्स फास्टेस्ट रुट दाखवणार नाही.
वेगवान मार्गाऐवजी आता, पेट्रोल आणि गॅस वाचवण्यावर अधिक लक्षकेंद्रित - रिपोर्टनुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनी एक असं अपडेट आणणार आहे, ज्यात फास्टेस्ट रुट दिसणार नाही. त्याशिवाय नेव्हिगेशन अॅप असा रस्ता दाखवेल, ज्यात युजर पेट्रोलची बचत करू शकेल. नव्या अल्गोरिदममध्ये, आता Google Maps इंधन वापरावर लक्षकेंद्रित करुन हे सांगेल, की एखाद्या मार्गावर, प्रवासादरम्यान किती गॅस किंवा पेट्रोल खर्च होईल.
नव्या फीचरच्या मदतीने कार्बन कमी करण्यास मदत होईल. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं, की वेगवान मार्गाचा पर्याय पूर्णपणे बंद केला जाणार नाही. जर युजर पेट्रोल आणि गॅस बचतीच्या मार्गाचा अवलंब करु इच्छित नसल्यास, तो फास्टेस्ट रुटवर येऊ शकतो.