शमीच्या जागी उमेश यादव टी20 संघात
मोहाली, 18 सप्टेंबर**:** ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेआधी टीम इंडियाला काल एक मोठा धक्का बसला. मोहालीत दाखल होण्यापूर्वी टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्याला आगामी तीन टी20 सामन्यांना मुकावं लागणार आहे. पण त्याच्याजागी गेले तीन वर्ष एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना न खेळलेल्या उमेश यादवला संघात स्थान मिळालं. यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण त्यावर आज मोहालीत झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं स्पष्टीकरण दिलं. शमीऐवजी उमेशच का**?** वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यांसाठी मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यात आला आहे. पण कोरोनामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळता येणार नाही. त्याच्या जागी काल बीसीसीआयनं उमेश यादवला संघात घेतलं. यावरुन आज रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रोहितनं म्हटलंय की, ‘ शमीऐवजी आमच्याकडे काही पर्याय होते. पण त्यापैकी प्रसिध कृष्णाला दुखापत झाली आहे. मोहम्मद शमी इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळतोय. तीन सामन्यांसाठी इतका मोठा प्रवास करुन त्यानं येणं आम्हाला योग्य वाटलं नाही. आणखी एक पर्याय होता तो आवेश खानचा. पण तोही आशिया कपदरम्यान आजारी पडला. त्यामुळे मग आम्ही उमेश यादवच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.’ हेही वाचा - T20 World Cup: राहुल नव्हे तर वर्ल्ड कपला ‘हा’ असणार रोहितचा जोडीदार? ओपनिंगवरुन रोहितचं मोठं विधान
उमेश, शमी तिन्ही फॉरमॅटमध्ये फिट
उमेश यादवच्या सिलेक्शनबद्दल बोलताना रोहित पुढे म्हणाला की उमेश आणि शमीसारख्या गोलंदाजांनी प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे ते जर फिट असतील तर त्यांना संघात स्थान दिलं जाईल, त्यांचा फॉर्म कसा आहे हे पाहण्याची गरज नाही. उमेशनं तर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे.’ असंही रोहित म्हणाला. उमेशची टी20 कामगिरी 2012 साली टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या उमेश यादवनं आजवर केवळ 7 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं आपला शेवटचा सामना फेब्रुवारी 2019 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर आता 3 वर्षांनी उमेश यादवचं भारताच्या टी20 संघात पदार्पण झालं आहे.