मुंबई, 25 डिसेंबर : भारताचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला लोळवले. पहिल्या डावात 5 विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवने सामन्यात 8 गडी बाद केले. याशिवाय त्याने 40 धावाही केल्या होत्या. कसोटी संघात 22 महिन्यांनी संधी मिळाल्यानंतरही त्याला दुसऱ्या सामन्यात वगळण्यात आले. बीसीसीआय़च्या या निर्णयानंतर क्रिकेट तज्ज्ञांसह चाहत्यांनीही टीका केली. आता कसोटी मालिका जिंकल्यानंतर कर्णधार केएल राहुलने कुलदीप यादवला संघातून का वगळले याबद्दल खुलासा केला आहे. कुलदीप यादवबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर केएल राहुलने म्हटलं की, आयपीएलमध्ये जो इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू केला आहे तो कसोटीत असता तर दुसऱ्या डावात कुलदीप यादव नक्की संघात दिसला असता. पहिल्या सामन्यात संघाला विजय मिळून दिला होता त्यामुळे त्याला वगळण्याचा निर्णय कठीण होता. पण पहिल्या दिवशी खेळपट्टी पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना मदत मिळेल. त्यामुळे आम्हाला संतुलन साधले जाईल असा संघ हवा होता. तेव्हा आम्ही निर्णय घेतला आणि याचा मला पश्चाताप नाही. हेही वाचा : शेवटी आम्हीही माणूसच; केएल राहुलने सांगितलं ड्रेसिंगरूममध्ये कसं होतं वातावरण? तुम्ही पाहिलंत तर वेगवान गोलंदाजांनी बऱ्याच विकेट घेतल्याचं दिसेल. वेगवान गोलंदाजीला मदत होईल अशी उसळणारी खेळपट्टी होती. आम्ही हा निर्णय एकदिवसीय सामन्यातील आमच्या अनुभवाच्या आधारावर घेतलं असं आश्चर्यचकित करणारं उत्तर केएल राहुलने दिलं. पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होईल अशी अपेक्षा नव्हती, पण नाणेफेक झाल्यानंतर केएल राहुलने खुलासा केला होता की फिरकीपटू कुलदीप यादवच्या जागी वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट खेळणार आहे. जयदेव उनादकटने 12 वर्षांनी भारतासाठी आपली दुसरी कसोटी खेळली. दुसऱ्या कसोटीत खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी ठरली, त्यामुळे कुलदीपला वगळण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले गेले. तर जयदेव उनादकटला दोन्ही डावात फक्त 3 विकेट घेता आल्या.