गांगुली ठरला राजकारणाचा बळी?
कोलकाता, 12 ऑक्टोबर : दुर्गापूजेचा सण संपला की बंगाली माणसांमध्ये थोडीशी निराशेची झालर पसरलेली असते. मात्र मंगळवारी त्यात आणखी भर पडली. भारतीय क्रिकेटचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI च्या अधिकाऱ्यांनी नव्या बोर्ड सदस्यांची नावं घोषित केली. आधीचे बहुतांश सर्व सदस्य कायम आहेत; मात्र विकेट गेली ती एकट्या सौरव गांगुलीची. पूर्वी ‘13’ आकडा अनलकी समजला जायचा; पण आता गांगुलीला 14 हा आकडाही आयुष्यात सकारात्मक बातमी आणत नाही. 2008मध्ये महानवमीच्या उत्सवी वातावरणात ‘दादा’ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता 14 वर्षांनंतर, दुर्गापूजेचा माहौल नुकताच ओसरला असताना पुन्हा एकदा दुःखाचा प्रसंगआला. क्रिकेटर सौरव गांगुलीने 22 यार्डांशी फारकत घेतली 14 वर्षांपूर्वी. आणि आता 11 ऑक्टोबर 2022 रोजी प्रशासक सौरव गांगुली बोर्डाच्या ड्रेसिंग रूमच्या बाहेर जायच्या वाटेवर आहे. हितचिंतकांना असं वाटतं, की गांगुलीला पदावरून दूर करण्यामागे राजकारणाचा हात आहे. बंगालचा आयकॉन असलेल्या सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदाची मुदत सुप्रीम कोर्टाच्या नव्या कायद्यानुसार आणखी तीन वर्षांनी वाढवलेली असूनसुद्धा, त्याच्याकडे आता BCCIचं कोणतंही पद नाही. सौरव गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला नाही, हे त्याला पदावरून काढून टाकण्यामागचं कारण असावं, अशी चर्चा आहे. 2019मध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष बनल्यानंतर भाजपला सौरव गांगुलीला बंगालच्या राजकारणात उतरवायचं होतं’; मात्र सौरवने वारंवार जाहीररीत्याही हे सांगितलं होतं, की तो राजकारणात येण्यास इच्छुक नाही. कोलकात्यात बेहला इथे गांगुलीच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एके रात्री जेवायला गेले होते. त्यानंतरही समीकरणात काही बदल झाला नाही. अखेर, राजकारणापासून अंतर ठेवण्याच्या सौरवच्या निर्णयामुळे त्याला त्याच्या पदावर पाणी सोडावं लागलं का?
अमित शहांचे पुत्र जय शहा यांच्याकडे बोर्डाचं सेक्रेटरी पद कायम आहे. अनुराग ठाकूर यांचे बंधून अरुण धुमल यांना आता खजिनदार राहण्यात रस नाही. त्यांना IPL चे अध्यक्ष केलं जात आहे. उपाध्यक्षपद राजीव शुक्लांकडे असेल. कपिल देव यांच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे सदस्य असलेल्या रॉजर बिन्नी यांच्याकडे अध्यक्ष केलं जात आहे. भारतीय क्रिकेटसाठी चांगलं योगदान असूनही केवळ गांगुलीच रिकाम्या हातांनी परतला आहे. हेही वाचा - Mushtaq Ali T20: धोनीच्या पठ्ठ्यानं टी20त केली कमाल, ‘या’ मराठमोळ्या खेळाडूचं मुश्ताक अली स्पर्धेत शतक दुसरीकडे सौरवकडे ICC चं अध्यक्षपद येण्याची शक्यता खूप कमी आहे. विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरवच्या विरोधात दोघांची नावं प्रस्तावित केली जात आहेत. ती म्हणजे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि BCCI चे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन. आपल्या व्यग्रतेतूनही अनुराग तिकडे जाऊ शकत असतील, तर तेच या स्पर्धेत आघाडीवर असतील. श्रीनिवासन एकदा BCCIचे आणि एकदा ICCचे अध्यक्ष होते. जावई गुरुनाथ मय्यप्पनवर आयपीएलध्ये बेटिंगचे झालेले आरोप, त्यानंतर देशभरातून झालेली त्यांच्या राजीनाम्याची मागणी, ‘मीडिया ट्रायल’ या सगळ्यानंतर तयार झालेल्या एका प्रचंड दबावानंतर श्रीनिवासनना दोन्ही पदांवरून काढून टाकण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रशासकांच्या समितीने बोर्डाचा कारभार हाती घेतला होता; पण गोष्टी जशा आहेत तशाच घडत राहिल्या, तर सौरव हे येत्या काळात फक्त नावच राहील. केवळ काळच या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.