फेडरर आणि नदाल लेव्हर कप सामन्यानंतर
मुंबई, 24 सप्टेंबर**:** लंडनमध्ये काल लेव्हर कपदरम्यान स्वित्झर्लंडचा महान टेनिसवीर रॉजर फेडररनं आपल्या स्पर्धात्नक टेनिस कारकीर्दीतला शेवटचा सामना खेळला. टेनिसविश्वातला हा महान नायक आता यापुढे टेनिस कोर्टवर दिसणार नाही. शेवटच्या लढतीत तो त्याचा आजवरचा प्रतिस्पर्धी राफेल नदालसोबत डबल्स खेळण्यासाठी कोर्टवर उतरला. टीम युरोपचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या जोडीला अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉकनं 4-6, 7-6, 11-9 अशी मात दिली. सामन्यानंतर फेडरर भावूक 41 वर्षांचा फेडरर या सामन्यानंतर फार भावूक झाला. तो अक्षरश: रडू लागला. त्यावेळी त्याच्या शेजारी असलेल्या राफेल नदालच्या डोळ्यातही अश्रू होते. 24 वर्षांच्या ग्रँड कारकीर्दीची ती अखेर होती. फेडरर आणि नदालचा हा व्हिडीओ पाहून जगातल्या अनेक टेनिसचाहत्यांचे डोळेही नक्कीच पाणावले असतील.
विराट कोहलीची पोस्ट फेडररच्या या अखेरच्या सामन्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीनंही सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे. विराटनं ट्विटरवर लिहिलंय… कुणी कधी विचार केला होता का की एकमेकांचे प्रतिस्पर्ध्यी अशा प्रकारे एकमेकांविषयी आपली भावना व्यक्त करतील? हेच खेळातलं सौंदर्य आहे. हे माझ्यामते जगातलं खेळांच्या दुनियेतलं सर्वात सुंदर दृश्य आहे. तुमच्या डोळ्यात जेव्हा तुमच्या सहकाऱ्यासाठी अश्रू येतात तेव्हा तुम्हाला माहित असतं की देवानं तुम्हाला जे कौशल्य दिलं आहे त्याच्यासह तुम्ही तुमच्या आयुष्यात किती काही चांगलं करु शकता. या दोघांसाठी खूप सारा आदर…’
दुखापत आणि निवृत्ती फेडररनं काही दिवसांपूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती. गेल्या वर्षी विम्बल्डनमध्ये हरल्यानंतर दुखापतीमुळे फेडरर बरेच महिने टेनिसपासून दूर होता. त्याच्या गुडघ्यावर तीन वेळा शस्त्रक्रियाही झाली. त्यामुळे 41 वर्षांच्या फेडररनं थांबण्याचा निर्णय घेतला. पण 24 वर्षानंतर टेनिसपासून दूर जाताना दु:ख होत असल्याचं त्यानं बोलून दाखवलं होतं. फेडररनं आजवर एकेरीत 103 विजेतेपदं पटकावली आहेत. त्यात 20 ग्रँड स्लॅम स्पर्धांचा समावेश आहे.