पाकिस्तानविरुद्ध सामन्यापूर्वी विराटचा 'हाय अल्टिट्यूड मास्क' लावून सराव!
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : आपल्या खराब फॉर्ममुळे विराट कोहली दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहिला होता, पण आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धा 2022 (Asia Cup 2022) मध्ये तो पुन्हा मैदानावर खेळताना दिसला आणि त्याच्या फॅन्सना हायसं वाटलं. भारतीय टीमचा माजी कॅप्टन विराटने आपला फॉर्म पुन्हा सिद्ध करायला सुरुवात केली आहे असं आशिया कपच्या पहिल्या दोन मॅचेसमधील त्याच्या खेळावरून वाटलं. आता रविवारी 4 सप्टेंबर 22 ला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचच्या आधी विराट नेटाने सराव करताना दिसतोय. त्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात प्रसिद्ध झाले आहेत. विराटने आशिया कप 2022 स्पर्धेतील पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या मॅचमध्ये 35 रन्सची झुंजार खेळी करून दाखवली आणि त्यानंतर हाँगकाँगविरूद्धच्या दुसर्या मॅचमध्ये आपल्या जुन्या फॉर्मनुसार खेळ करत विराटने नाबाद 59 रन्स केल्या. हॉंगकॉंगविरुद्धच्या सामन्यात विराटने एक फोर आणि तीन सिक्सची आतषबाजी केली. आता भारत पुन्हा एकदा पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. ही लढत 4 सप्टेंबरला दुबईतल्या दुबई इंटरनॅशनल स्टेडियमध्ये (Dubai International Stadium) होणार असून दोन्ही संघ कसून सराव करताना दिसत आहेत. विराट कोहली ह्या सामन्यासाठी कसून सराव करताना दिसतोय. विराट कोहली 18 क्लब ह्या ट्विटर अकांउंटवर विराटच्या सरावाचे काही फोटो शेअर झालेले आहेत.
दरम्यान, विराटचा सराव करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात विराटने सरावादरम्यान हाय अल्टिट्युड मास्क (High Altitude Mask) लावलेला दिसतोय. या मास्कमुळे श्वास घेतल्यानंतर फुफ्फुसांचा विस्तार होतो तसंच त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते. केवळ क्रिकेटपटूंसाठीच नाही तर एकंदरच सर्व खेळाडूंसाठी फुफ्फुसांची कार्यक्षमता उत्तम असणं अगदी गरजेचं असतं. या मास्कचा उपयोग हा गिर्यारोहकांसाठी वरदान ठरतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे गिर्यारोहण (Hill Trekking) करताना शिखराकडे जाताना ऑक्सिजनची कमतरता(Oxygen Deficiency) भासते. त्यावेळेस या मास्कमुळे गिर्यारोकाला श्वास घेणं सोपं होतं. विराटने सरावादरम्यान पळताना जेव्हा मैदानाला फेर्या मारल्या त्यावेळेस त्याने हा हाय अल्टिट्युड मास्कचा वापर केला होता. पण पळण्याचा सराव संपल्यावर त्याने हा मास्क काढून ठेवल्याचं व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं. सरावादरम्यान फिजिकल ट्रेनर (Physical Training & Guidance) सोहम देसाईंनी विराट कोहलीला मार्गदर्शन केलं. वाचा - विनोद कांबळीची अडचण दूर, एक लाख पगाराच्या ऑफर लेटरसह कंपनीचे चेअरमन थेट घरी या सीरिजमधील आधीच्या मॅचमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी भारताला जोरदार टक्कर दिली होती. ते उद्याच्या मॅचमध्ये वचपा काढण्याचा प्रयत्न करतील आणि भारतीय टीमही त्यांना हरवून पुढच्या फेरीत जाण्यासाठी सज्ज असेल. त्यामुळे उद्याच्या मॅचनंतरच पुढची स्थिती स्पष्ट होईल.