मुंबई, 14 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलनंतर किंग कोहलीने देखील शतक ठोकले आहे. किंग कोहलीचे हे 74 वे शतक असून या शतकासह विराटने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने गुवाहाटीत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यातही विस्फोटक फलंदाजी करून 80 चेंडूत त्याने शतक ठोकले होते. विराटच्या या शतकानंतर त्याच्यावर सर्वस्थरातून शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज पारपडत आहे. या वनडे मालिकेत आतापर्यंत भारताने दोन सामने जिंकले असून मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. या दोन विजयासह भारताने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका जवळपास खिशात घातली असून आज देखील भारताचा संघ श्रीलंकेवर भारी पडताना दिसत आहे. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमनने देखील या सामन्यात 89 चेंडूत शतक ठोकले. तर आता किंग कोहलीने देखील शतक ठोकून पुन्हा एकदा गर्जना केली आहे. विराटने 85 चेंडूत नाबाद शतक ठोकले आहे. हे ही वाचा : IND Vs SL : भर सामन्यात मोठा अपघात, खेळाडूला स्ट्रेचरवरून न्यावं लागलं बाहेर विराट कोहलीने या शतकासह मायदेशात सर्वाधिक शतकं करण्याचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने मायदेशात 160 सामन्यांमध्ये 20 वेळा शतक ठोकले होते. तर विराट कोहलीने मायदेशात खेळलेल्या केवळ 101 सामन्यात 21 वेळा शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. याआधी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रिकी पॉन्टिंग याचा ही मायदेशातील 151 सामन्यात 14 वेळा शतक ठोकण्याचा विक्रम केला होता. विराट कोहलीने आतापर्यंत वनडे सामन्यात श्रीलंका विरुद्ध तब्बल 10 वेळा शतक केले आहे. विराटाचे वनडे सामन्यातील 46 वे शतक आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत वनडे सामन्यात 12708 धावा करून पाचव्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेचा खेळाडू जयवर्धनेला मागे टाकले आहे. सध्या वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर 18426 धावांसह पहिल्या स्थानी आहे.