टीम डेव्हिड आणि पोलार्ड
मुंबई, 7 ऑक्टोबर: मुंबई इंडियन्स म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो रोहित शर्मा. रोहित शर्माबरोबरच गेली अनेक वर्ष एक नाव मुंबई इंडियन्सशी जोडलं गेलं आहे. ते नाव आहे कायरन पोलार्ड. पोलार्डनं 2010 साली आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सशी करार केला. आणि तेव्हापासून गेली 12 वर्ष पोलार्ड आणि मुंबई हे नवं समीकरण तयार झालंय. मुंबईच्या पाचही आयपीएल विजयात पोलार्डचा मोठा वाटा होता. पण हाच पोलार्ड आता वयाच्या पस्तिशीत पोहोचला आहे. गेले काही मोसम त्याच्या बॅटमधून वाहणारा धावांचा ओघ कमी झालाय. त्यामुळे आता पोलार्डची जागा कोण घेणार असा प्रश्न प्रत्येक मुंबई इंडियन्सच्या चाहत्याला पडला असेल. पण मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाकडे पोलार्डची जागा घेणारा शिलेदार सज्ज आहे आणि सध्या तो ऑस्ट्रेलियात क्रिकेटचं मैदान गाजवतोय. टिम डेव्हिड मुंबईचा पुढचा पोलार्ड? मूळचा सिंगापूरचा असलेला धडाकेबाज फलंदाज टिम डेव्हिड सध्या ऑस्ट्रेलियाकडून आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये प्रतिनिधित्व करणार आहे. सध्या तो टी20 फॉरमॅटमध्ये सुपर फॉर्मात आहे. मधल्या फळीत खेळणाऱ्या टिम डेव्हिडला तो खेळत असलेल्या क्रमांकावर जोरदार फटकेबाजी करण्याचं जणू लायसन्सच मिळतं. त्यामुळे हाणामारीच्या ओव्हर्समध्ये टिम डेव्हिडसमोर गोलंदाजांची धुलाई ठरलेलीच. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातही डेव्हिडनं आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवून दिली होती. हाच डेव्हिड गेल्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला होता. त्याला कमी सामन्यात संधी मिळाली पण त्यानं मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं होतं. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी तो नक्कीच भविष्यातला पोलार्ड ठरु शकतो.
वेस्ट इंडिजविरुद्ध तुफानी खेळी याच टिम डेव्हिडनं आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तुफानी खेळी केली. त्यानं अवघ्या 20 बॉल्समध्ये 42 धावा ठोकल्या. इतकच नाही तर ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर झालेल्या या सामन्यात डेव्हिडनं चक्क 110 मीटर लांब सिक्सर ठोकला.
डेव्हिडच्या याच खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकून टी20 वर्ल्ड कपआधी 2 सामन्यांच्या या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं.