टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड
मुंबई, 22 ऑगस्ट**:** भारतीय संघ आशिया चषकासाठी आज रवाना होणार आहे. पण आशिया चषकाच्या या मोहिमेआधी टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बीसीसीआयनं ट्विटरवरुन अधिकृतरित्या याची माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांना कदाचित स्पर्धेला मुकावं लागणार आहे. त्यांच्या जागी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मणची भारताचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. द्रविड यांना सौम्य लक्षणं टीम इंडियाची आशिया चषक मोहीम 28 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ आज दुबईला प्रयाण करणार आहे. पण भारतीय संघासोबत राहुल द्रविड यांना मात्र जाता येणार नाही. दुबईला रवाना होण्यापूर्वी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी करण्यात येते. त्यात द्रविड यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत असून बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे.
हाय व्होल्टेज सामन्याआधी दोन धक्के आशिया चषकाआधीच भारतीय संघाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला याआधी दुखापतीमुळे आशिया चषकाला मुकावं लागलं होतं. आणि आता स्पर्धेला निघण्यापूर्वीच राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं दुसरा मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या हाय व्होल्टेज मुकाबल्याआधी टीम इंडियाला चांगली तयारी करावी लागणार आहे.