विराट-राहुलचं संघात कमबॅक
मुंबई, 08 ऑगस्ट – येत्या 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या 15 सदस्यीय संघात विराट कोहली आणि लोकेश राहुलचं पुनरागमन झालं आहे. पण मुंबईकर श्रेयस अय्यरला मात्र वगळण्यात आलं आहे. हर्शल पटेल आणि जसप्रीत बुमरा हे आघाडीचे गोलंदाज दुखापतीमुळे संघात खेळताना दिसणार नाहीत. तर संजू सॅमसन आणि इशान किशनलाही संघात स्थान देण्यात आलेलं नाही. आशिया चषकासाठीचा भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक (विकेट कीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान
बुमराला दुखापत, भारताला धक्का जाहीर झालेल्या भारतीय संघात एक मोठं नाव नाही. ते नाव आहे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचं. दुखापतीमुळे जसप्रीत बुमरा आशिया कपमध्ये खेळणार आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मासह टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार बुमरा पाठीच्या दुखण्यामुळे आशिया चषकाच खेळू शकणार नाही. बुमरा भारताचा महत्वाचा गोलंदाज आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकाच्या आधी तो पूर्णपणे फिट व्हावा असं आम्हाला वाटतं. त्यामुळे त्याची सध्याची दुखापत पाहता आम्ही कोणतीही जोखीम स्वीकारणार नाही. असंही या अधिकाऱ्यानं पीटीआयशी बोलताना सांगितलं. दरम्यान इंग्लंड दौऱ्यातल्या वन डे मालकेत तो शेवटचा खेळला होता. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बुमराला विश्रांती देण्यात आली होती. पण यादरम्यान पाठीचं दुखणं बळावल्यानं बुमराला आशिया चषकाला मुकावं लागणार आहे. विराट-राहुलचं कमबॅक इंग्लंड दौऱ्यानंतर विश्रांती घेतलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली संघात परतला आहे. इंग्लंडमधील कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर विराटनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली होती. विराटसह दुखापतीमुळे संघातून बाहेर असलेल्या लोकेश राहुलचंही संघात कमबॅक झालं आहे. हेही वाचा - CWG 2022: सिंधूचं पदक का ठरलं भारतासाठी खास? पाहा, सिंधूच्या सोनेरी यशाचं वैशिष्ट्य श्रेयस अय्यरला डच्चू वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टीत श्रेयस अय्यरनं सलामीला येत 64 धावांची दमदार खेळी साकारली होती. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी आशिया चषकासाठीच्या भारतीय संघातून श्रेयसचं नाव वगळण्यात आलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.