Photo-ICC
पर्थ, 27 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये गुरूवारी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. झिम्बाब्वेने अत्यंत रोमांचक अशा सामन्यात पाकिस्तानचा शेवटच्या बॉलवर 1 रनने पराभव केला. पाकिस्तानचा यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधला हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवासोबतच पाकिस्तानचं आता सेमी फायनलमध्ये पोहोचणंही अवघड झालं आहे. याआधी रविवारी टीम इंडियानेही पाकिस्तानवर विजय मिळवला होता. झिम्बाब्वेने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये फक्त 130 रनपर्यंतच मजल मारता आली. सिन विलियम्सने सर्वाधिक 31 रन केले, तर इरव्हाईन आणि ब्रॅड इव्हान्स यांनी प्रत्येकी 19-19 रनची खेळी केली. रेयान बर्ल 10 रनवर नाबाद राहिला. झिम्बाब्वेच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 129 रन करता आले. शान मसूदने 44 आणि मोहम्मद नवाझने 22 रनची खेळी केली. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने 3 विकेट घेतल्या. याशिवाय ब्रॅड इव्हान्सला 2, जोंगवे आणि मुझराबानी यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. रेयान बर्लचा प्रेरणादायी प्रवास रेयान बर्ल याने नाबाद 10 रनशिवाय 1 ओव्हरमध्ये फक्त 7 रन दिल्या. मागच्याच वर्षी रेयान बर्ल हा चर्चेत आला होता. फाटके बूट घालून खेळायला लागत असल्याची खंत बर्ल याने व्यक्त केलं होती. आपल्या फाटक्या बुटांचा फोटो बर्ल याने सोशल मीडियावर शेअर केला होता. रेयान बर्लची ही पोस्ट बघून प्युमा या स्पोर्ट्स शूज बनवणाऱ्या कंपनीने संपूर्ण झिम्बाब्वेच्या टीमला बूट दिले. प्युमाच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर क्रिकेट रसिकांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
‘आम्हाला स्पॉन्सर मिळण्याची संधी आहे का? प्रत्येक सीरिजनंतर आम्हाला बूट गमने चिकटवावे लागत आहेत,’ अशी पोस्ट रेयान बर्लने केली होती. या पोस्टसोबत त्याने फाटलेल्या बुटांचा फोटोही टाकला होता.