मेलबर्न, 23 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या बॉलवर रोमांचक विजय झाला. विराट कोहली टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. विराटने 53 बॉलमध्ये नाबाद 82 रन केले, यात 4 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. तर हार्दिक पांड्याने 37 बॉलमध्ये 40 रन केले. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 160 रनचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था 31/4 अशी झाली होती. नसीम शाहने केएल राहुलला बोल्ड केलं, यानंतर हारिस राऊफने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवला माघारी धाडलं. पहिल्या तीन विकेट गमावल्यानंतर भारताला अक्सर पटेलच्या रुपात चौथा धक्का बसला, पण अक्सर पटेलची ही विकेट वादात सापडली आहे. सातव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला अक्सर पटेल रन घेण्यासाठी धावला, पण विराटने त्याला माघारी पाठवलं.
विराटने मागे जायला सांगितल्यामुळे अक्सरचा गोंधळ झाला, तेव्हा बाबरने थ्रो विकेट कीपर मोहम्मद रिझवानच्या दिशेने फेकला, पण रिझवानला बॉल नीट हातात पकडता आला नाही आणि त्याने हातानेच स्टम्प उडवला. चूक लक्षात आल्यानंतर रिझवान वैतागला आणि त्याने हात जोरात झटकले. अक्सर पटेलच्या रन आऊटचा निर्णय घेण्यासाठी स्क्वेअर लेग अंपायरने थर्ड अंपायरकडे विचारणा केली. थर्ड अंपायरने रिप्ले बघितल्यानंतरही अक्सर पटेलला आऊट देण्यात आलं. यानंतर सोशल मीडियावरून थर्ड अंपायरवर जोरदार निशाणा साधण्यात आला.