पाकिस्तान वि. श्रीलंका फायनल
दुबई, 11 सप्टेंबर**:** यंदाच्या आशिया चषकाचा मानकरी कोण? याचं उत्तर दुबईच्या मैदानात आज रात्री मिळणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन संघात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मेगा फायनल रंगणार आहे. बाबर आझम आणि दसून शनाकाच्या फौजा या महामुकाबल्यासाठी सज्ज झाल्या आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या निर्णायक सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन कशी असेल यावर नजर टाकूयात. नसीम, शादाबचं कमबॅक अपेक्षित आशिया चषकातल्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानला श्रीलंकेकडून 5 विकेट्सनी हार स्वीकारावी लागली होती. तो सामना औपचारिक असला तरी पाकिस्ताननं आपला तगडा संघ मैदानात उतरवला होता. पण त्या लढतीत युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि अनुभवी लेग स्पिनर शादाब खानला विश्रांती देण्यात आली होती. फायनलमध्ये या दोघांचं संघात कमबॅक अपेक्षित आहे. याशिवाय साखळी सामन्यानंतर जायबंदी झालेला वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी फिट झाला आहे. पाकिस्तानसाठी ही जमेची बाब आहे. सहाव्या विजेतेपदासाठी श्रीलंका सज्ज आशिया चषकाच्या आजवरच्या इतिहासात श्रीलंकेनं पाच वेळा आशिया चषक पटकावला आहे. त्यामुळे जेतेपदाचा षटकार ठोकण्याची संधी श्रीलंकेसमोर आहे. यंदाच्या स्पर्धेत श्रीलंकेनं साखळी फेरीपासूनच दमदार कामगिरी बजावली आहे. बांगलादेशविरुद्धचा चुरशीचा सामना जिंकून श्रीलंकेनं सुपर फोर फेरी गाठली. त्यानंतर सुपर फोर फेरीत भारत आणि पाकिस्तान या दोन बलाढ्य संघांसह अफगाणिस्तानलाही पराभूत केलं. त्यामुळे फायनलमध्ये खेळताना श्रीलंकन संघाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला असेल. फलंदाजीत सलामीच्या पथुन निसंका, कुशल मेंडिस आणि राजपक्षे यांच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. तर वानिंदू हसरंगा, महीश तीक्षणा, दिलशान मधुशंका आणि करुणारत्ने यांच्यावर गोलंदाजीची मदार राहील
हेही वाचा - शरद पवार विरुद्ध फडणवीस पुन्हा रंगणार सामना? मिलिंद नार्वेकरही शर्यतीत पाकिस्तान तिसऱ्या विजेतेपदाच्या शोधात आशिया चषकात भारतीय संघ सर्वात यशस्वी ठरलाय. भारतानं आजवर 7 वेळा आशिया चषक जिंकला आहे. पण पाकिस्ताननं मात्र केवळ दोनदाच आशिया चषकावर नाव कोरलंय. पाकिस्ताननं शेवटचा आशिया कप जिंकला त्याला आता 12 वर्ष उलटली आहे. 2010 साली पाकिस्ताननं शेवटचा आशिया कप जिंकला होता. त्यामुळे यंदा बाबर आझमची सेना विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज असेल. दुसरीकडे 2014 नंतर पहिल्यांदाच श्रीलंकन संघ आशिया चषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग इलेव्हन - मोहम्मद रिझवान (विकेट कीपर) , बाबर आझम (कप्तान), फखर झमान, इफ्तिकार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, आसिफ अली, खुशदिल शाह, हॅरिस रौफ, नसीम शाह, शाहनवाज दहानी किंवा मोहम्मद हसनैन
श्रीलंकेची संभाव्य प्लेईंग इलेव्हन – कुशल मेंडिस, पथुन निसंका, धनंजय डिसिल्वा, धनुष्का गुणतिलका, दसून शनाका, भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा, महीश तीक्षणा, प्रमोद मधुशान, दिलशान मधुशंका