श्रीलंका वि. पाकिस्तान
दुबई, 11 सप्टेंबर: यंदाच्या आशिया चषकाच्या मेगा फायनलमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान आमनेसामने आले आहेत. पण नाणेफेकीचा महत्वाचा कॉल पाकिस्ताननं जिंकून श्रीलंकेला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान संघात शादाब आणि नसीम शाहचं कमबॅक झालं आहे. तर श्रीलंकेनं गेल्या सामन्यातला संघ कायम ठेवला आहे. पाकिस्तान संघ - मोहम्मद रिझवान (विकेट कीपर) , बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, इफ्तिकार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, आसिफ अली, खुशदिल शाह, हॅरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन. श्रीलंकेचा संघ – कुशल मेंडिस (विकेट कीपर), पथुन निसंका, धनंजय डिसिल्वा, धनुष्का गुणतिलका, दसून शनाका (कर्णधार), भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा, महीश तीक्षणा, प्रमोद मधुशान, दिलशान मधुशंका संघाच्या कामगिरीविषयी समाधानी दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वी श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकानं आशिया चषकातल्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केलं आहे. सुपर फोरमध्ये श्रीलंकेनं भारत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला हरवून फायनल गाठली आहे. खरं तर यंदाच्या आशिया चषकाचं आयोजन श्रीलंकेत करण्यात आलं होतं. पण श्रीलंकेतल्या अस्थिर राजकीय वातावरणामुळे स्पर्धा यूएईत घेण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट काऊन्सिलनं घेतला आहे. त्यामुळे श्रीलंकेतल्या अस्थिर वातावरणाच्या परिस्थितीतही संघानं मिळवलेलं हे यश खास असल्याचं शनाकानं म्हटलं आहे.
सहाव्या विजेतेपदासाठी श्रीलंका सज्ज आशिया चषकाच्या आजवरच्या इतिहासात श्रीलंकेनं पाच वेळा आशिया चषक पटकावला आहे. त्यामुळे जेतेपदाचा षटकार ठोकण्याची संधी श्रीलंकेसमोर आहे. यंदाच्या स्पर्धेत श्रीलंकेनं साखळी फेरीपासूनच दमदार कामगिरी बजावली आहे. बांगलादेशविरुद्धचा चुरशीचा सामना जिंकून श्रीलंकेनं सुपर फोर फेरी गाठली. त्यानंतर सुपर फोर फेरीत भारत आणि पाकिस्तान या दोन बलाढ्य संघांसह अफगाणिस्तानलाही पराभूत केलं. त्यामुळे फायनलमध्ये खेळताना श्रीलंकन संघाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला असेल. फलंदाजीत सलामीच्या पथुन निसंका, कुशल मेंडिस आणि राजपक्षे यांच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. तर वानिंदू हसरंगा, महीश तीक्षणा, दिलशान मधुशंका आणि करुणारत्ने यांच्यावर गोलंदाजीची मदार राहील.