श्रीलंका वि. अफगाणिस्तान
शाहजाह, 3 सप्टेंबर: आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीतल्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेनं अफगाणिस्तानचा 4 विकेट्सनी दणदणीत पराभव केला. या विजयासह श्रीलंकेनं अफगाणिस्तानची विजयी मालिका खंडित केली. स्पर्धेच्या साखळी फेरीत ब गटात अफगाणिस्ताननं दोन्ही सामने जिंकून अव्वल स्थान गाठलं होतं. त्यामुळे शारजाच्या मैदानात अफगाणिस्तानचा संघ विजयाची हॅटट्रिक करण्याच्या निर्धारानं उतरला होता. पण आजवर पाच वेळा आशिया चषक जिंकणाऱ्या श्रीलंकेनं अफगाणी संघाचे विजयाचे मनसुबे उधळून लावले. या सामन्यात अफगाणिस्ताननं श्रीलंकेला विजयासाठी 176 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण श्रीलंकेनं हे लक्ष्य पाच चेंडू राखून पार केलं. श्रीलंकेची सांघिक कामगिरी श्रीलंकेच्या विजयात प्रत्येक खेळाडूनं मोलाचं योगदान दिलं. खासकरुन 176 धावांचा पाठलाग करताना लंकन फलंदाजांनी छोट्या पण महत्वपूर्ण खेळी साकारल्या. निसंका आणि कुशल मेंडिसनं 62 धावांची सलामी दिली. निसंकानं 35 तर मेंडिसनं 36 धावा केल्या. त्यानंतर धनुष्का गुणतिलकानंही अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करताना 33 धावांचं योगदान दिलं. तर राजपक्षेनंही 31 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेला विजयी लक्ष्य गाठणं सोपं गेलं. अफगाणिस्तानकडून मुजीब आणि नवीन उल हकनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
हेही वाचा - Asia Cup 2022: दुसऱ्या महामुकाबल्यासाठी टीम इंडिया सज्ज, पाहा कशी असेल भारताची प्लेईंग XI? गुरबाजची धडाकेबाज खेळी या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. पण रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झादरानच्या दमदार खेळीच्या जोरावर अफगाणिस्ताननं 20 षटकात 6 बाद 175 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या. गुरबाजला शतक साजरं करण्याची संधी होती. पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो 84 धावांवर बाद झाला. त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि तब्बल 6 षटकारांचा समावेश होता. त्यानं झादरानसह 93 धावांची खेळीही साकारली. झादराननं 40 धावांचं योगदान दिलं. श्रीलंकेकडून मधुशंकानं दोन आणि तिक्षणा-असिथानं एक एक विकेट घेतली.