मुंबई, 25 जानेवारी : भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या टेनिसपटू जोडीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत सेमीफायनलमध्ये ग्रेट ब्रेटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसीरा क्रॉज्जिक यांचा पराभव केला आहे. यासह सानिया आणि रोहन ही जोडी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचली आहे. भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा हिची ग्रँडस्लॅम मधील ही शेवटची स्पर्धा असून या स्पर्धेनंतर सानिया टेनिस विश्वातून निवृत्ती घेणार आहे. सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय टेनिसपटू जोडीने सुरुवातीपासूनच खेळाची आक्रमक सुरुवात केली होती. या जोडीनं पहिला सेट 7-6 च्या फरकानं नावावर केला होता. त्यानंतर दुसऱ्या सेट मध्ये सानिया रोहनला 6-7 च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. परंतु यानंतर सानिया आणि रोहन यांनी जोरदार पुनरागमन करून 10-6 च्या फरकाने हा सामना जिंकला.
सानिया मिर्झाची तिच्या कारकिर्दीतील ही शेवटची स्पर्धा असल्यामुळे या स्पर्धेत अंतिम सामना जिंकून विजेतेपद मिळवण्याचा मानस सानियाचा असेल. ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरी स्पर्धेतील उपांत्य पूर्व सामन्यातून जेलेना ओस्टापेंको आणि डेविड वेगा हर्नांडेज यांच्या जोडीनं माघार घेतल्यामुळे सानिया आणि रोहन यांना बाय मिळाली होती.