मुंबई, 11 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी गुवाहाटी येथे पारपडला असून या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 67 धावांनी विजय मिळवला. भारताने या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली असून भारताच्या या विजयात विराट कोहलीच्या शतकी खेळीचा मोठा वाटा होता. विराट कोहलीने या सामन्यात 80चेंडूत 100 धावांचा टप्पा ओलांडला. हे विराटाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 73 वे शतक ठरले. या दमदार शतकानंतर विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. अशातच क्रिकेटचा देव अशी ओळख असणाऱ्या सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला शुभेच्छा देत एक खास ट्विट केले आहे. विराट कोहलीचे भारत विरुद्ध श्रीलंका वन डे सामन्यात ठोकलेले शतक हे त्याचे वन डे क्रिकेट मधील 45 वे शतक ठरले. विराट कोहलीने 80 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने शतक पूर्ण करून नाबाद खेळी केली. विराट कोहलीने या शतकासह मायदेशात सर्वाधिक शतकं करण्याच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने मायदेशात 160 सामन्यांमध्ये 20 वेळा शतक ठोकले होते. तर विराट कोहलीने मायदेशात खेळलेल्या केवळ 99 सामन्यात 20 वेळा शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. विराटच्या या शतकी खेळीनंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करत त्याला शुभेच्छा दिल्या. सचिनने लिहिले, “विराट याच प्रकारे विराट कामगिरी करीत राहा, आणि भारताच नाव उज्ज्वल करीत राहा”. सोबतच सचिनने विराटाचे काही फोटो देखील ट्विट केले आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यातही विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेच्या गोलंदाजांवर भारी पडण्याची शक्यता आहे.