दिल्ली, 20 जानेवारी : रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली विरुद्ध मुंबईच्या सामन्यात शुक्रवारी मोठी उलथापालथ झाली. दिल्लीने हिम्मत सिंहच्या नेतृत्वाखाली मुंबईला 8 गडी राखून धूळ चारली. दिल्लीने गेल्या 42 वर्षात पहिल्यांदाच मुंबईविरुद्ध विजय मिळवला. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात दिल्लीने मुंबईला फक्त दोनच वेळा पराभूत केलं आहे. दिविज मेहराच्या गोलंदाजीमुळे मुंबईला दिल्लीसमोर केवळ 95 धावांचे आव्हान ठेवता आले. या धावा दिल्लीने दोन गड्यांच्या मोबदल्यात काढून विजय मिळवला. दिल्लीचा या हंगामातील पहिलाच विजय ठरला आहे. याआधीच्या पाच पैकी दोन सामन्यात दिल्लीचा पराभव झाला तर तीन सामने अनिर्णित राहिले. दिल्लीने मुंबईविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सरफराज खानच्या शतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 293 धावा केल्या. सरफराज खानशिवाय मुंबईच्या इतर एकाही फलंदाजाला 40 धावांच्या वर जाता आलं नाही. सरफराजने 16 चौकार आणि 4 षटकारांसह 125 धावांची खेळी केली होती. तर दिल्लीकडून प्रांशु विजयरानने सर्वाधिक 4 गडी बाद केले होते. हेही वाचा : शुभमन नव्हे तर महिला क्रिकेटरच्या नावावर आहे सर्वात कमी वयात द्विशतकाचा विश्वविक्रम दिल्लीने पहिल्या डावात 369 धावा केल्या आणि मुंबईवर 76 धावांची आघाडी मिळवली. वैभव रावल आणि कर्णधार हिम्मत सिंह यांच्या भागिदारीमुळे दिल्लीने मोठी धावसंख्या उभारली. पाचव्या गड्यासाठी 195 धावांची भागिदारी केली. तर वैभव रावलने 114 आणि हिम्मत सिंहने 85 धावा केल्या. मुंबईकडून तुषार देशपांडने चार गडी बाद केले. पहिल्या डावात 293 धावा करणाऱ्या मुंबईचा दुसरा डाव मात्र गडगडला. कर्णधार अजिंक्य रहाणे वगळता एकही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही. पहिल्या डावातील शतकवीर सरफराज खान शून्यावर बाद झाला. मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यात दिल्लीच्या दिविज मेहराने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 13 षटकात 30 धावा देत 5 गडी बाद केले. मुंबईचा दुसरा डाव 197 धावातच बाद झाला.