खो खो लीगचा विजेता ओडिशा संघ
पुणे, 4 सप्टेंबर**:** गेले दोन आठवडे पुण्याच्या बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सुरु असलेला अल्टिमेट खो खोचा थरार आज संपला. या स्पर्धेच्या पहिल्यावहिल्या पर्वात ओडिशा जगरनट्स संघानं विजेतेपदाचा मान मिळवला. मराठमोळ्या सूरज लांडेच्या अफलातून स्काय डाईव्हमुळे या चुरशीच्या सामन्यात ओडिशानं तेलगू योद्धाजचा 46-45 असा अवघ्या एका गुणाच्या फरकानं विजय मिळवला. अंतिम सामन्यात तेलगू योद्धाज संघानं तिसऱ्या सत्रापर्यंत 41-27 अशी आघाडी घेतली होती. पण चौथ्या आणि अखेरच्या सत्रात ओडिशानं हा फरक कमी केला. सामना संपण्यात दीड मिनिटांचा वेळ असताना तेलगु योद्धाजकडे 45-43 अशी दोन गुणांची आघाडी होती. सूरज लांडेची स्काय डाईव्ह निर्णायक दोन गुणांची आघाडीही तेलगू योद्धाजसाठी पुरेशी ठरली असती. पण सामना संपण्यास अवघे 14 सेकंद बाकी असताना सूरज लांडेनं कमाल केली. त्यानं अफलातून स्काय डाईव्हवर तेलगू योद्धाजच्या अवधूत पाटीलला बाद करुन संघाला तीन महत्वाचे गुण मिळवून दिले आणि इथेच तेलगू योद्धाजच्या विजयाचा घास ओडिशानं अक्षरश: हिरावून घेतला. आणि 46-45 असा अवघ्या एका गुणानं विजय मिळवला.
विजेत्यांना एक कोटीचं बक्षिस विजेत्या ओडिशा संघाला एक कोटी रुपयांचं पारितोषिक आणि झळाळता चषक प्रदान करण्यात आला. तर तेलगू योद्धाज 50 लाखांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. तर तिसऱ्या स्थानावरील गुजरात जायंट्सला 30 लाख रुपये बक्षिस स्वरुपात मिळाले. अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्यानं ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.