शाहरुख खानने केकेआर विरुद्ध अर्जुन तेंडुलकरच्या डेब्यूवर केलं ट्विट
मुंबई, 17 एप्रिल : रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स या सामन्यात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तब्बल दोन वर्षांनी अर्जुन तेंडुलकरला कर्णधार रोहित शर्माने मुंबईच्या प्लेयिंग 11 मध्ये खेळण्याची संधी दिली. यानिमित्ताने बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने अर्जुन तेंडुलकरला ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. आयपीएल 2023 मधील 22 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पारपडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकातावर 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने अर्जुनला प्रथमच मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली. त्यामुळे सचिन आणि अर्जुन तेंडुलकर ही बाप लेकाची जोडी आयपीएलमध्ये खेळणारी पहिली जोडी ठरली.
अर्जुनचे आयपीएलमध्ये पदार्पण होताच त्याच्यावर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेक दिग्गज क्रिकेटर्स सह बॉलिवूड स्टार्सनी देखील त्याचे अभिनंदन केले. बॉलिवूडचा सुपरस्टार आणि कोलकाता नाइट रायडर्सचा मालक शाहरुख खान याने देखील अर्जुनचे अभिनंदन करून ट्विट केले. त्याने लिहिले, " हे आयपीएल स्पर्धात्मक असेल… पण जेव्हा तुम्ही मित्राचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मैदानात उतरताना पाहता तेव्हा ही खूप आनंदाची आणि आनंदाची गोष्ट असते. अर्जुनला शुभेच्छा आणि सचिन हा तुझ्यासाठी किती अभिमानाचा क्षण आहे. व्वा".
सध्या शाहरुख खानचे हे ट्विट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.